मुसळधार पावसामुळे नाशिककर हैराण 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2019

 

पुणे  : राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाची बरसात सुरू आहे. बुधवारी (ता. २४) नाशिक जिल्ह्याच्या द्राक्ष पट्ट्याला मुसळधार पावसाने चांगलाच दणका दिला आहे. द्राक्षपिकाबरोबरच कांदा, भात, टोमॅटो पिकांनाही मोठा फटका बसला आहे. गुरुवारी सकळपर्यंतच्या २४ तासांमध्ये पावसाचा जोर काहीसा ओसरला होता. तर गुरुवारी सकाळपासून सिंधुदुर्ग, पुणे, सातारा जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींनी हजेरी लावली. 

 

पुणे  : राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाची बरसात सुरू आहे. बुधवारी (ता. २४) नाशिक जिल्ह्याच्या द्राक्ष पट्ट्याला मुसळधार पावसाने चांगलाच दणका दिला आहे. द्राक्षपिकाबरोबरच कांदा, भात, टोमॅटो पिकांनाही मोठा फटका बसला आहे. गुरुवारी सकळपर्यंतच्या २४ तासांमध्ये पावसाचा जोर काहीसा ओसरला होता. तर गुरुवारी सकाळपासून सिंधुदुर्ग, पुणे, सातारा जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींनी हजेरी लावली. 

नाशिक जिल्ह्यातील सिद्धपिंपरी येथे अतिवृष्टी झाल्याने द्राक्ष बागांमध्ये गुडघाभर पाणी साचले होते. निफाड तालुक्यात नांदुर्डी, दावचवाडी, पालखेड, शिरवाडे या भागांत टोमॅटोचा पाला गळाल्याने लागवडी खराब होण्याचा धोका निर्माण झाला आहे. देवळा तालुक्यात अनेक ठिकाणी खळ्यांवर काढून ठेवलेल्या मक्याची कणसे, सोयाबीन पाण्यात सडणार आहे. द्राक्षबागांच्या छाटण्या वेगाने सुरू असून, मुसळधार पावसाने काड्यांवरील मणी बऱ्यापैकी गळाले आहेत. ढगाळ हवामानामुळे द्राक्षावर डाऊनी, घडकूज, करप्याचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. 

नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवस सातत्याने पडणाऱ्या पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे दिसले. रात्री नगर शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागांत जोरदार पाऊस झाला. आठवडाभरापासून पाऊस पडत असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. मुळा धरणातून १६०० तर ओझर बंधाऱ्यातून ८१४ क्युसेकने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. पावसाने खरिपातील सोयाबीन, कापूस, तूर यांसह भाजीपाल्याच्या पिकांचे नुकसान होत आहे. अनेक भागांत शेतात, पिकांत पाणी साचले आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरुवारी (ता. २४) पहाटेपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. दुपारी एक वाजेपर्यंत जिल्ह्यात पाऊस सुरूच होता. दुपारनतंर पाऊस थांबला असला, तरी जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. पावसामुळे भातशेती अडचणीत आली आहे. सर्व जिल्ह्यात पाऊस कोसळत असल्यामुळे भातकापणीची कामे रखडली आहेत. अनेक भागांतील भातशेती जमिनीला लगडली आहे. 

पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवस सातत्याने पडणाऱ्या पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. गुरुवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये हवेली, मावळ, खेड, आंबेगाव, बारामती, दौंड आणि पुरंदर तालुक्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्या. मावळ तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. वडगाव मावळ येथे सर्वाधिक ५५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जोरदार पावसाने उजनी धरणातून सुमारे ३० हजार क्युसेक, घोड धरणातून ५ हजार ८०० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. 

सातारा जिल्ह्यात दुष्काळग्रस्त तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. फलटण तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान वाढत आहे. फलटण, माण, खटाव, कोरेगाव तालुक्यांत पडणाऱ्या पावसाने बाजरी, ज्वारी तसेच द्राक्ष, डाळिंबाचे नुकसान झाले. महाबळेश्‍वर, जावळी, पाटण, सातारा तालुक्यांतील कमी अधिक पाऊस सुरूच असून, भात, सोयाबीन, ज्वारी, स्ट्रॅाबेरीचे नुकसान होत आहे. 

सांगली जिल्ह्यात बुधवारपासून पावसाने उघडीप दिली आहे. सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण होते. पावसाने उघडीप दिली असली तरी द्राक्षावर डाऊनी, करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. जिल्ह्यात अतिपावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शिराळा, वाळवा, पलूस, कडेगाव, मिरज तसेच कवठेमहांकाळ तालुक्‍यांतील बहुतांशी गावांत जोराचा पाऊस झाला. पावसाने उघडीप मिळाल्याने कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. मात्र, शेतात अजूनही पाणी आहे. रब्बी हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

नांदेड जिल्ह्यातील अनेक मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. जिल्ह्यातील नांदेड, हदगाव, किनवट, माहूर, हिमायतनगर, बिलोली, मुखेड, कंधार, लोहा तालुक्यांतील ३२ मंडळांमध्ये मध्यम पाऊस झाला. याशिवाय परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडला.

WebTittle:: Heavy rains hamper Nashik
 


संबंधित बातम्या

Saam TV Live