अम्फाननंतर नव्या वादळाचा धोका, कोकण किनारपट्टीवर हाय अलर्ट

साम टीव्ही
सोमवार, 1 जून 2020

अम्फाननंतर नव्या वादळाचा धोका
कोकण किनारपट्टीवर हाय अलर्ट
ताशी 30 ते 40 किमी वेगाने वाहणार वारे

एकीकडे केरळात मॉन्सून दाखल झालेला असतानाच अवघ्या काही तासांत महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात वादळाचा मोठा तडाखा बसण्याची शक्यताय. हवामान विभागाने किनारपट्टी भागाला सतर्कतेचा इशाराही दिलायअम्फान चक्रिवादळ शमतंय तोवर अरबी समुद्रात नवं चक्रिवादळ आकार घेतंय.

अरबी समुद्रात पुढील 48 तासांत कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांच्या किनारपट्टी भागांमध्ये 3 जूनपर्यंत वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे.

अरबी समुद्रात सध्या निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं रुपांतर चक्रीवादळात झाल्यास त्याचं ‘निसर्ग’ असं नामकरण केलं जाईल. त्यामुळे 3 ते 6 जून दरम्यान महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टी भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. 

विशेषतः कोकण किनारपट्टीवरील 5 जिल्ह्यांना वादळाचा धोका असून कोकण किनारपट्टीवर ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. ही बाब लक्षात घेता चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी कोकणात NDRF ला पाचारण करण्यात आलंय. आपत्ती नियंत्रण कक्षालाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्यात. 

पुढचे दोन दिवस समुद्र खवळलेला राहणार आहे. त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये अशा सूचना हवामान खात्याने दिल्यात.


संबंधित बातम्या

Saam TV Live