मुंबईकर पाण्याविना कोरोनाशी कसं लढणार? 2 लाख मुंबईकरांची वणवण

साम टीव्ही
बुधवार, 9 डिसेंबर 2020
  • दोन लाख मुंबईकरांची वणवण
  • पाण्याविना कोरोनाशी कसं लढणार?
  • श्रमिक मुंबईकरांचा खर्च वाढला

कोरोनाच्या काळात मुंबईकरांनी दाखवलेल्या शिस्तीचं अवघ्या जगभरात कौतुक झालं. मात्र याच मुंबईकरांना कोरोनाच्या काळात मोठ्या पाणीटंचाईला सामोरं जावं लागलंय.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत पुरेसा पाणीसाठा असूनही मुंबईकरांना मात्र पाण्यासाठी वणवण करावी लागतेय. कोरोनामुळे स्वच्छतेची आवश्यक ती काळजी घेण्यासाठी पाण्याचा वापर वाढलाय. त्यामुळे मुंबईकरांना पाणीटंचाई जाणवतेय. पाणी हक्क समिती, सेंटर फॉर प्रोमोटिंग डेमॉक्रसी आणि विकास अध्ययन केंद्र यांनी केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आलीय.

टाळेबंदीपूर्वी काही ठिकाणांहून पाणी मोफत मिळवता येत असे. मात्र लॉकडाऊनमुळे ते स्रोतही बंद झाले. त्यामुळे पाणी विकत घेण्याचे प्रमाण वाढून खर्चही वाढला. 

मुंबईतल्या श्रमिक वस्त्यांध्ये पूर्वी पाण्यासाठी महिन्याला साधारण 600 रुपये खर्च करणाऱ्या कुटुंबाला 700 ते 750 रुपये खर्च करावे लागले. तसंच शौचालयाचा खर्च मासिक 50 रुपयांवरून 270 रुपयांवर गेलाय. मुंबईतल्या 33 वस्त्यांमधील 292 कुटुंबांचं सर्वेक्षण करण्यात आलं होतं. त्यापैकी 25 टक्के कुटुंबांना नियमित पाणी मिळत नाही. तर 19 टक्के कुटुंबांना लॉकडाऊनमध्ये पाण्यासाठी दूरवर जावं लागतंय. आणि 3 टक्के कुटुंबांना पाणी मिळवण्याच्या प्रयत्नात तर पोलिसी कारवाईलाही सामोरं जावं लागलंय. 

कोरोनाविरुद्धची लढाई जिंकायची असेल तर सर्व मुंबईकरांना पुरेसं पाणी आणि स्वच्छतेच्या सुविधा पुरविणं आवश्यक आहे. त्यामुळे राज्य सरकारने मुंबई महापालिकेसह सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांना पुरेसा पाणीपुरवठा करण्याचे निर्देश देण्याची मागणी जोर धरतेय.


संबंधित बातम्या

Saam TV Live