बर्ड फ्ल्यूमुळे पोल्ट्रीफार्म चालकांचं प्रचंड नुकसान, नेमकं काय आहे यामागचं कारण? वाचा सविस्तर...

साम टीव्ही
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021
  • पोल्ट्रीतील प्रति कुक्कुट पक्षाची उत्पादन किंमत 70 रुपये
  • बर्ड फ्ल्यूमुळे मागील महिनाभरापासून 55 रुपये प्रति पक्षी विक्री करण्याची वेळ
  • एका पक्षामागे 15 रुपयांचं नुकसान

कोरोनानंतर आलेल्या बर्ड फ्लूच्या संकटानं राज्यातील पोल्ट्री व्यावसायिकांचं कंबरड मोडलंय. बर्ड फ्लूचा थेट परिणाम कोंबडी आणि अंडी विक्रीवर झाला. यातून गेल्या एका महिन्यात पोल्ट्री व्यावसायिकांना हजारो कोटी रुपयांचं नुकसान झालंय.

शेतीपूरक उद्योग म्हणून राज्यभरात मोठ्या प्रमाणात पसरलेला पोल्ट्री उद्योग सध्या मोठ्या संकटातून जातोय. राज्यातल्या अनेक जिल्ह्यात मागील महिनाभरापासून बर्ड फ्ल्यूनं थैमान सुरू असून अनेक ठिकाणी लाखो कुक्कुट पक्षांची किलिंग करावी लागतेय. तर बर्ड फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर बाजारात चिकन आणि अंड्यांची मागणी घटल्यानं चिकन आणि अंड्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरलेत. त्यामुळे पोल्ट्री उद्योगाला मागील एका महिन्यात तब्बल 1600 कोटी रुपयांचा फटका बसलाय.

नेमका हा फटका कसा बसलाय 

 

  1. पोल्ट्रीतील प्रति कुक्कुट पक्षाची उत्पादन किंमत 70 रुपये
  2. बर्ड फ्ल्यूमुळे मागील महिनाभरापासून 55 रुपये प्रति पक्षी विक्री करण्याची वेळ
  3. एका पक्षामागे 15 रुपयांचं नुकसान
  4. वजनानुसार 2 किलोच्या एका पक्षामागे 30 रुपयांचं नुकसान
  5. अंड्याचा उत्पादन खर्च प्रति अंडे 4 रुपये इतका येतो
  6. बर्ड फ्ल्यूमुळे सध्या 3 रुपये दराने अंड्याची विक्री करण्याची वेळ
  7. मागील एका महिन्यापासून प्रति अंडे 1 रुपया नुकसान

मागील महिनाभरात राज्यात 4 कोटी कोंबड्यांची विक्री झालीय. यामध्ये पोल्ट्री उत्पादकांना तब्बल 1200 कोटी रुपयांचं नुकसान सहन करावं लागलंय, तर अंडी विक्रीतही जवळपास 400 कोटी रुपयांचा फटका पोल्ट्री व्यवसायाला बसलाय. तर मागील वर्षी कोरोना संकटाच्या काळातही पोल्ट्री व्यवसायाला 3000 कोटींचा तोटा सहन करावा लागला होता. या संकटातून हळूहळू पोल्ट्री व्यावसायिक सावरत असतांनाचं बर्ड फ्ल्यूच्या संकटानं पोल्ट्री व्यवसायाला पुन्हा एकदा उध्वस्त केलंय.

भारतात 2006 सालापासून आत्तापर्यंत 28 वेळा पोल्ट्री व्यवसायावर बर्ड फ्ल्यू संकट आलंय. मात्र या संकटातून सावरत शेतीला पूरक व्यवसाय म्हणून नावारूपाला आलेल्या पोल्ट्री व्यवसायाची राज्यातली उलाढाल 15,000 कोटींच्या घरात आहे. मात्र आधी कोरोना आणि आता बर्ड फ्ल्यूच्या आक्रमणामुळे वर्षभरातचं पोल्ट्री व्यवसायाला साडे चार ते पाच हजार कोटींचा फटका बसलाय. तर पोल्ट्रीशी निगडित असलेल्या मक्याची मागणीही घटल्यानं मक्याचे दर 1400 रुपये प्रति क्विंटल वरून 1250 प्रति क्विंटलपर्यंत खाली आल्यानं पोल्ट्री उत्पादकांसह मका उत्पादक शेतकरीही अडचणीत सापडलेत.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live