मी न्यायालयात जाणार नाही, तेथे न्याय नाही- रंजन गोगाई

SAAM TV
रविवार, 14 फेब्रुवारी 2021

देशाची न्यायव्यवस्था जीर्ण झाली असून मला विचाराल तर मी कुठल्याही गोष्टीसाठी न्यायालयात मुळीच जाणार नाही...तेथे तुम्हाला न्याय मिळत नाही.. असे धक्कादायक विधान माजी सरन्यायाधीश आणि राज्यसभेचे खासदार रंजन गोगोईंनी केलंय...

देशाची न्यायव्यवस्था जीर्ण झाली असून मला विचाराल तर मी कुठल्याही गोष्टीसाठी न्यायालयात मुळीच जाणार नाही...तेथे तुम्हाला न्याय मिळत नाही.. असे धक्कादायक विधान माजी सरन्यायाधीश आणि राज्यसभेचे खासदार रंजन गोगोईंनी केलंय...  न्यायालयात जाणे पश्चात्ताप करून घेण्यासारखे असल्याची टिप्पणीदेखील त्यांनी केली...  भोपाळच्या राष्ट्रीय न्यायिक अकादमीत निकाल कसा लिहावा हे शिकवले जात नाही... न्यायालयीन कामकाजात कसे वागावे हे शिकवले जात नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली...दरम्यान रंजन गोगोई यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गोगोई यांच्या वक्तव्यावर भाष्य केलंय....माजी सरन्यायाधीशांनी न्यायव्यवस्थेबाबत केलेलं वक्तव्य हे धक्कादायक असल्याचं ते म्हणालेत...

नवी दिल्ली : भारतीय न्यायव्यवस्था जर्जर झाल्याचे सांगत माजी सरन्यायाधीश आणि राज्यसभेचे खासदार रंजन गोगोई यांनी कशासाठीही न्यायालयात जाणार नसल्याचे वक्तव्य केले आहे. तुम्ही न्यायालयात गेला तर स्वत:चेच खराब झालेले कपडे धुवत बसावे लागते. न्यायालयात गेल्यावर तुम्हाला पश्चाताप होतो. तिथे न्याय मिळत नाही, असेही गोगोई म्हणाले.

एका वृत्त वाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात गोगोई यांनी भारतीय न्यायव्यवस्थेवर परखडपणे भाष्य केले. गोगोई हे नोव्हेंबर 2019 मध्ये निवृत्त झाले असून ते मार्च 2020 मध्ये राज्यसभा सदस्य झाले. गोगोई म्हणाले, ''तुम्हाला 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था हवी आहे. पण आपल्या न्यायव्यवस्थेची स्थिती खूप दयनीय झाली आहे. केवळ लाखो रुपये असलेले लोकच सर्वोच्च न्यायालयात जाण्याची जोखीम पत्करतात.''

सरन्यायाधीश असताना गोगोई यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप झाले होते. या प्रकरणाचा निवाडा गोगोई यांनी स्वत:च केल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी केला होता. त्याला उत्तर देताना गोगोई यांनी हे वक्तव्य केले. ''तुम्ही न्यायालयात गेल्यानंतर तुमच्या वैयक्तिक गोष्टी सार्वजनिक करता. पण तुम्हाला कधीच न्याय मिळत नाही. मीही न्यायालयात जाणार नाही. आपल्या न्यायाव्यवस्थेच्या स्थितीचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे,'' असे गोगोई यांनी सांगितले. 

एखाद्यावर आरोप करताना सत्य परिस्थितीची माहिती हवी. या प्रकरणासाठी सर्वोच्च न्यायालयाने स्वतंत्र समिती नेमली होती. हीच आपल्या देशाची समस्या आहे. काही गोष्टी माहिती नसताना आपण त्यावर भाष्य करतो, अशी टीकाही गोगोई यांनी केली.

भोपाळ येथील राष्ट्रीय अकादमीमध्ये न्यायालयीन काम करताना कसे वागावे, मूल्ये, तत्व शिकविली जात नाहीत. तर सागरी कायदे अशा गोष्टी शिकविल्या जातात. त्याचा न्यायालयीन कामाशी संबंध नसतो. न्यायव्यवस्थेतील दोष दूर करण्यासाठी रोडमॅप तयार करायला हवा, असेही गोगोई यांनी स्पष्ट केले.

अयोध्या व राफेल प्रकरणी केंद्र सरकारच्या बाजूने निकाल दिल्यामुळे खासदारकी मिळाल्याची टीका गोगोईंवर केली जाते. हे आरोप फेटाळून लावत ते म्हणाले, मी जर काही तडजोड केली असती तर फक्त राज्यसभेवर संतुष्ट झालो असतो? काहीतरी मोठे मागितले असते. या गोष्टींतचा मी विचार करत नाही. मी राज्यसभेचे वेतनही घेत नाही, असे सांगत गोगोई यांनी आपल्यावरील आरोप खोडून काढले. 

"योग्य कामासाठी योग्य व्यक्तीची नियुक्ती व्हायला हवी. सरकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती होते तशी न्यायाधीशांची नियुक्ती होऊ शकत नाही. परीक्षा दिली आणि न्यायाधीश झाले, असे होत नाही. त्यासाठी कामाप्रति कटिबध्दता हवी. न्यायाधीश 24 तास काम करतात. त्यांच्या कामाचे तास ठरलेले नसतात," असे गोगोई म्हणाले.


संबंधित बातम्या

Saam TV Live