'थोडं थांबा! आत्महत्या कसली करताय?' टेन्शन आल्यास करा 'हे' उपाय 

साम टीव्ही
शनिवार, 20 जून 2020
  • 'भावांनो, थोडं थांबा! आत्महत्या कसली करताय ?'
  • आत्महत्या हा काही पर्याय नाही 
  • टेन्शन आल्यास करा 'हे' उपाय 

लॉकडाऊनच्या काळात आत्महत्यांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झालीय. आर्थिक अस्थिरतेतून या आत्महत्या होत असल्याचं समोर आलंय. मात्र, आत्महत्या हा काही त्याला पर्याय नाही. 

कोरोनामुळे संपूर्ण देशभरात लॉकडाऊन सुरू झालं. त्यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेलाच खीळ बसली. यातूनच अनेक जण नैराश्येच्या गर्तेत गेलेयत. त्यातून अनेकांनी टोकाचं पाऊल उचलून आत्महत्या केल्याच्या घटनाही गेल्या काही दिवसात घडल्यात. एका बाजूला कोरोनाची भीती, तर दुसरीकडे घरी बसून संसार कसा चालवायचा, कर्जाचे हप्ते कसे फेडायचे, मुलांची फी कशी भरायची, असे एक ना अनेक प्रश्न अनेकांना भेडसावतायत. त्यातच कुणाच्या नोकऱ्या गेल्यात, कुणाचा धंदा पूर्णपणे बसलाय, कुणाचे पगार कमी झालेयत. अशा स्थितीतून मार्ग तरी कसा काढायचा असा सवाल निर्माण झालाय. 

गेल्या दोन महिन्यांपासून होत असणाऱ्या आत्महत्यांमागे आर्थिक अस्थिरता हे प्रमुख कारण असल्याचं समोर आलंय. 

अशा वेळी हाती असणाऱ्या पैशांचं योग्य नियोजन करायला हवं. स्वत:चा प्राधान्यक्रम ठरवून महिनाभराचं बजेट आखून तसा खर्च करायला हवा. बॅंकांचे हप्ते भरण्याची मुदत ऑगस्टपर्यंत देण्यात आलीय. त्यामुळे थेट हप्ते बंद करू शकता. सावकाराचं कर्ज असेल तर त्यालाही पुढच्या महिन्यांची मुदत द्यायला हवी. जर तो ऐकत नसेल तर सरळ पोलिसांची मदत घ्या. आपल्यावर कर्ज असणं हा गुन्हा नाही, हे लक्षात घ्या. 

लॉकडाऊनमुळे अनेक कंपन्या बंद पडल्यात. काहींनी नोकर कपात केलीय. जर तुम्हाला नोकरीवरून काढून टाकलं असेल तर घाबरू नका. तुमच्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

राज्य सरकारच्या उद्योग आणि कौशल्य विकास विभागानं नोकरी देण्यासाठी विविध पर्याय तयार केलेयत. त्यासाठी तुम्ही www.mahaswayam.gov.in या वेबसाइटवर जाऊन त्याठिकाणी बेरोजगारांसाठी कोणत्या संधी उपलब्ध आहेत, याची माहिती घेऊ शकता.  कोणतंही काम कमी दर्जाचं नसतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. 

तुमच्यात वेगळं कौशल्य असेल तर तुम्ही तुमचा व्यवसायही करू शकता. आत्महत्येचा विचार वारंवार येत असेल तर आपल्या जवळच्या व्यक्तींशी बोला, न लाजता डॉक्‍टरांचा सल्ला घ्या. सरकारी रूग्णालयांमध्ये तसेच हेल्पलाईनद्वारे मानसोपचारतज्ज्ञांचा तुम्हाला मोफत सल्ला मिळू शकतो. 

कोरोनानंतरच्या परिस्थितीत आता बदल होत आहे.  त्यामुळे त्याचा ताण मनावर घेऊन कोणतंही पाऊल टाकू नका. फक्त धीराने सामोरे जा. रात्रीनंतर दिवस आहे हे आपण दररोज पाहतो, त्यामुळे मुळीच निराश न होता. कामाला लागा. 


संबंधित बातम्या

Saam TV Live