गाडीवर  पत्नी बरोबर  असेल तर.......

रवि पत्की.
गुरुवार, 26 नोव्हेंबर 2020

टूव्हीलर वर पत्नी बरोबर असेल तर काही गोष्टी प्रारब्धाचा भाग आहेत हे मनाला पक्के सांगून निघायचे धाडस करावे.

 

Ok, बरं, बरोबर आहे,you are right, बघूया,वगैरे शब्द तुम्ही घरच्या पेक्षा वाहनावर अधिक उच्चारले आहेत हे तुम्हाला आठवत नसेल तर तुम्ही Let go हे तत्व जगला आहात असे समजून तुम्हाला प्रणाम करून काही गोष्टीचा उहापोह करतो.
टूव्हीलर वर पत्नी बरोबर असेल तर काही गोष्टी प्रारब्धाचा भाग आहेत हे मनाला पक्के सांगून निघायचे धाडस करावे.

आपण टू व्हीलर बाहेर काढली की कशी फक्त आपलीच सीट स्वच्छ आहे आणि मागच्या सीटवर दिवसेंदिवस फडके मारले गेलेले नाही ह्याची आठवण कम ताकीद दिली जाते.मग डिक्की उघडून त्यातील फडके काढून पूर्ण गाडीवर फिरवले जाते. 

गाडी स्टार्ट केली की सर्विसिंगला टाकली पाहिजे अशी एक उगाच कामाला लावणारी कंमेंट केली जाते. गाडी स्टार्ट झालेला पहिला आवाज आणि सर्विसिंगचि आठवण ह्या उद्दीपन-प्रतिसाद ह्या प्रतिक्षिप्त क्रिया शृंखलेचे एक सार्वत्रिक न दिले गेले उदाहरण आहे.त्यातून गाडीतून कुठलातरी वेगळा आवाज आला असेल तर बाहेरून परत  येताना तुम्ही गॅरेज मार्गे येऊन पायी घरी आलेले असता.

पत्नी मागे बसली आणि तुमचा प्रवास सुरु झाला की मागून 'सावकाश' ऐकू येतेच.
पंक्तीतला 'सावकाश' तुम्हाला मस्तं रिलॅक्स करते तर हे 'सावकाश' तुमची anxiety वाढवते. ह्यात कुठे आदळू नका,सुरक्षित घरी आणा अशा धमक्या असतात.

मग पेट्रोल आहे का व्यवस्थित नाहितर आधी पंपावर घ्या चे फर्मान निघते.पंपावर पेट्रोल भरून झाले की 'हवा बघून घ्या,दर पंधरा दिवसांनी पेट्रोल बरोबर हवा बघावी' ह्या पुढच्या नियमाची उजळणी होते.

कुठेही वळायचं असेल तर 20 मीटर आधी इंडिकेटर लावायचा आहे ही instruction आणि वळल्या वळल्या गल्लीत शिरायच्या आधीच इंडिकेटर बंद करा ही सूचना आली नाही तर मागे पत्नी नाही मित्र बसला आहे हे नक्की.

तुमचे छान जमेल फक्त काही मार्ग वेगळे असतील हे लग्नाआधी ज्योतिषाने सांगितलेले वाक्य चपखल वाटते जेव्हा स्टेशनला जाताना तुम्हाला मोकळ्या लकडीपुलावरून जावेसे वाटते आणि पत्नीला नदीपात्रातून. बर्याच लोकांना पुण्याच्या पूर्व भागात जाताना मुळा - मुठा परिक्रमेतून गेलो नाही तर पूर्वेची ठिकाणे ऑटोमॅटिक दक्षिणेला जातात अशी भीती वाटत असावी.

इच्छीत स्थळी पोचलो आणि गाड़ी लावायची म्हणली की 'पार्किंग आहे का इथे' हा प्रश्न यायलाच हवा. कुठल्यातरी भयंकर आतल्या,चेंगराचेंगीच्या तालेबानी गल्लीत की जिथे कायदे कानूनचा स्पर्श झालेला नसतो अशा गल्लीत P1 - P2 चे बोर्ड झटक्यात शोधणे हे M1 M2 पहिल्या फटक्यात विदाउट बॅक काढण्यासारखे आहे. कुठे P1 P2 सापडला नाही आणि गाडी लावावी लागली तर पोलिसाआधी पत्नीकडून लायसन्स,पेपर्स,फरासखाना,पाचशे रुपये ह्याची आठवण आवर्जून केली जाते.

ह्या सर्व अग्निदिव्यातून सहीसलामत  तुम्ही शॉपिंग वगैरे करून परतीच्या प्रवासाला निघता. वाटेत पत्नीला एका कॉलेज पाशी सोडायचे असते.तिथे तिचे मुलांपुढे चिंतामुक्तीचे दहा मार्ग ह्या विषयावर व्याख्यान असते. त्याला डॉट पोहचायचे असते.
Happy journey.


संबंधित बातम्या

Saam TV Live