बांधकाम क्षेत्राची सवलत तात्काळ स्थगित करा! देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

साम टीव्ही
सोमवार, 28 डिसेंबर 2020
  • कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावानंतर राज्यातील बांधकाम क्षेत्राला उभारी देण्याच्या नावाखाली मूठभर लोकांचं चांगभलं होत असून राज्याचं मात्र हजारो कोटींचं नुकसान होत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय.

मुंबई :- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावानंतर राज्यातील बांधकाम क्षेत्राला उभारी देण्याच्या नावाखाली मूठभर लोकांचं चांगभलं होत असून राज्याचं मात्र हजारो कोटींचं नुकसान होत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. परंतु त्यामुळे राज्याचे हजारो कोटी रूपयांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्राला दिलेल्या सवलतींबाबतचा निर्णय तत्काळ स्थगित करा, अशी मागणी करणारं पत्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे. 

या पत्रात ते म्हणाले आहेत की, बांधकाम जगताला उभारी देण्यासाठी काय उपाय करता येतील, यासाठी दीपक पारेख यांच्या अध्यक्षतेत एका समितीने काही शिफारसी राज्य सरकारला केल्या होत्या. परंतु, त्यातील काही निवडक आणि सोयीच्या शिफारसींची अंमलबजावणी केली जात आहे. पण, त्याचा केवळ मूठभर लोकांनाच लाभ होत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केलाय. असे करताना त्याचा परिणाम काय होईल, याचा कुठलाही विचार केला गेला नाही. राज्याच्या तिजोरीला फटका बसून काही निवडक लोकांनाच त्याचा लाभ होईल, अशा पद्धतीने काही लोक काम करत आहेत. त्यानुसार मुद्रांक शुल्कातील सवलत, रेडीरेकनर दर आणि प्रिमीयमशी निगडित काही सवलती सरकारने देऊ केल्यात. पण, त्याचा केवळ मूठभर लोकांनाच लाभ होणार नाही, हेही सुनिश्चित करणे आवश्यक आहे. या पत्रात देवेंद्र फडणवीस यांनी काही विकासकांची प्रकरणे आणि त्यांना कसा लाभ मिळेल, याची उदाहरणे सुद्धा दिली आहेत. आज राज्य सरकार दररोज आपल्या आर्थिक स्थितीबाबत चिंता करीत असताना राज्याच्या तिजोरीची अशी उघड लूट आपण होऊ देणार नाहीत आणि त्यामुळे तत्काळ त्यावर प्रभावी उपाययोजना कराल, अशी मला खात्री आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live