कोरोनामुळे करपलेल्या हातांना मानसिक कंप, कोरोना झाल्यापासून 7-8 महिन्यांत मोकळा श्वास नाहीच

साम टीव्ही
बुधवार, 9 डिसेंबर 2020
  • कोरोनामुळे करपलेल्या हातांना मानसिक कंप
  • ज्येष्ठ नागरिकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम
  • सात-आठ महिन्यांत मोकळा श्वास नाहीच

आता बातमी चहूबाजूंनी वेढलेल्या पण एकाकी बेटांची. कोरोनाच्या संकटात लॉकडाऊनमुळे प्रत्येकाच्या जगण्यावर बंधनं आली. त्याचसोबत वृद्धांनाही घरात अडकून पडावं लागलंय. त्यामुळे वृद्धांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही विपरित परिणाम झालाय.

कोरोनाच्या संकटामुळे जगातला प्रत्येकजण कातावून गेलाय. कोरोनाच्या राक्षसाने श्रीमंत-गरीब, लहान थोर असा भेद केलेलाच नाही. त्यामुळे प्रत्येकाच्या जगण्यावर मर्यादा आल्या. मात्र, त्याचसोबत सात ते आठ महिने सलग घरात कोंडून घेतल्याने ज्येष्ठ नागरिकांच्या शारीरिक आरोग्याचे प्रश्न तर निर्माण झालेच, पण त्याचसोबत त्यांच्या मानसिक अवस्थेवरही प्रचंड परिणाम झालेले पाहायला मिळतायत.

लॉकडाऊनमध्ये सात ते आठ महिने घरातच राहिल्यामुळे ज्येष्ठ नागरिक घराबाहेर पडलेच नाहीत. मॉर्निंग वॉक, ज्येष्ठ नागरिक संघ, गार्डनमध्ये जाणं त्यांना शक्य झालं नाही. परिणामी, ज्येष्ठ नागरिकांना मोकळी हवा आणि मोकळा श्वास मिळालाच नाही. त्यामुळे, ज्येष्ठ नागरिकांना सांधेदुखी, अंगदुखीच्या त्रासांना सामोरं जावं लागतंय. त्याचसोबत, ज्येष्ठ नागरिकांची चीडचीडही वाढल्याची प्रकरणं समोर आली आहेत.

संपूर्ण हयातभर कष्ट करून, आयुष्याची संध्याकाळ सुखात जावी इतकी माफक अपेक्षा या करपलेल्या हातांना असते. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे त्यांना घरातच राहावं लागलं. मन मोकळं करायचं तर हक्काची जागा नाही, मोकळा श्वास घ्यायचा तर घराबाहेर पडता येत नाही. अशा सगळ्या चक्रव्यूहात ही वृद्ध मंडळी अडकलीयत. त्यामुळे त्यांच्या भवतालात निर्माण झालेली पोकळी भरून काढायलाच हवी. त्यासाठी डॉक्टर, आणि गरज पडली तर मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यायलाच हवा, पण त्याचसोबत या सुरकुतलेल्या हातांना आपणही आधाराचा हात द्यायलाच हवा.


संबंधित बातम्या

Saam TV Live