मनसेमध्ये परप्रांतियांचं इन्कमिंग, परप्रांतियांना टार्गेट करणाऱ्या मनसेला अचानक त्यांचा पुळका कसा?

साम टीव्ही
गुरुवार, 11 फेब्रुवारी 2021
  • मनसेला आला परप्रांतियांचा पुळका
  • मनसेमध्ये परप्रांतियांचं इन्कमिंग 
  • प्रवेश सोहळ्याला राज ठाकरेंची उपस्थिती

एकेकाळी ज्या परप्रांतियांना टार्गेट करून महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न ज्या मनसेने केला, त्याच मनसेत आता परप्रांतियांना पक्षप्रवेश दिला जातोय. त्यामुळे मनसेला परप्रांतीयांचा इतका पुळका का आलाय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीय. 

नव्याने स्विकारलेला हिंदुत्वाचा मुद्दा आणि अयोध्या दौऱ्याची राज ठाकरेंनी केलेली घोषणा यामुळे मनसेत आता परप्रांतियांचं इन्कमिंग होतंय. आज राज ठाकरेंच्या उपस्थितीत कृष्णकुंज या निवासस्थानी जवळपास पाचशे परप्रांतीय कार्यकर्त्यांनी आज हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मनसेत प्रवेश घेतलाय.

मनसेच्या स्थापनेनंतर सुरूवातीला सर्वसमावेशक भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंनी सुरूवातीच्या राजकीय अपयशानंतर 2008 साली अचानक मराठी अस्मितेचा मुद्दा हाती घेतला. मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर मनसेने अनेक निवडणुकांची मैदानं मारली..पण आता हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेत राज ठाकरेंनी राजकीय आखाड्यात नव्याने शड्डू ठोकलाय. त्यामुळे मनसेसाठी नव्या राजकीय समिकरणांची संधी निर्माण झालीय.

शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसारख्या सेक्युलर विचारधारेच्या पक्षांसोबत हातमिळवणी केलीय. त्यामुळे शिवसेनेच्या बदललेल्या राजकीय भूमिकेचा फायदा उचलून राज्यातली हिंदू वोटबँक आपल्याकडे वळवण्याचा मनसेचा प्रयत्न आहे. त्यामुळेच आता परप्रांतियांसाठी पक्षात पायघड्या घातल्या जातायत. मात्र त्याचा पक्षाला किती फायदा झालाय, हे आगामी निवडणुकांमध्ये कळेल.


संबंधित बातम्या

Saam TV Live