कुरापतखोर चीनला भारताचं जोरदार प्रत्युत्तर 

साम टीव्ही
गुरुवार, 4 जून 2020
  • कुरापतखोर चीनला भारताचं जोरदार प्रत्युत्तर 
  • भारतानं चीनच्या दिशेनं वळवली बोफोर्सची तोंडं 
  • ड्रॅगनच्या नाकाखालून उडणार लढाऊ विमान

एकीकडे कोरोनानं भारताला ग्रासलं असतानाच दुसरीकडे सीमेवर चीननं कुरापती सुरु केल्यात. चीनच्या या कुरापतींना भारतानंही तितकंच सडेतोड उत्तर देण्यासाठी आता पावलं उचलली आहेत.

भारत आणि चीनचं सैन्य सध्या लडाखमध्ये आमनेसामने आलंय. गेल्या एक महिन्यापासून दोन्ही देशांत तणावाचं वातावरण आहे. वाद मिटवण्यासाठी दोन्ही देशांत चर्चा सुरू आहे. मात्र, असं असलं तरी चीनच्या  कुरापती लक्षात घेता, भारतानं पुरेपूर दक्षता बाळगलीय. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारताने लडाखजवळच्या 'लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोल'जवळ धावपट्टी तयार करण्याच्या कामाला गती दिलीय. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर ही इमर्जन्सी धावपट्टी उभारण्यात येतेय.

कुठलाही बाका प्रसंग उद्भवला तर इथे लढाऊ आणि इतर विमानं उतरवणं सहज शक्य व्हावं, यासाठी ही धावपट्टी तयार करण्यात येतेय. ही धावपट्टी तयार झाल्यास भारताची लढाऊ विमानं ड्रॅगनच्या नाकाखाली उतरतील आणि नाकाखालूनच उडतील. एवढंच नाही, तर भारतानं आपल्या बोफोर्स आर्टिलरी तोफांची तोंडंही आता चीनच्या दिशेनं वळवली आहेत.

कशी असेल ही धावपट्टी 

दक्षिण काश्मीरमधल्या बिज्बेहरा भागात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर ही धावपट्टी तयार केली जातेय. ही धावपट्टी ३ किलोमीटर इतक्या लांबीची असेल. हवाई दलाकडून या धावपट्टीच्या उभारणीचं काम सुरू आहे. चीनसोबतच्या तणावानंतर दोन दिवसांपूर्वीच या धावपट्टीचं काम सुरु झालंय. ॉसध्या लॉकडाऊन असलं तरीही या कामासंदर्भात लागणाऱ्या सगळ्या गोष्टींना प्रशासनानं परवानगी दिलीय.

लडाखच्या सीमावर्ती भागात चिनी सैन्य  शिरजोरी करण्याचा प्रयत्न करतंय. तर भारतीय लष्कराचे जवानदेखील त्यांच्यासमोर उभे ठाकलेयत. दोन्ही बाजूंकडून वाटाघाटीही सुरू आहेत, पण अद्याप हा वाद संपलेला नाही. आता पुन्हा एकदा दोन्ही देशांच्या लष्करांची चर्चा होणार आहे. 6 जूनला या संदर्भात दोन्ही देशांच्या लेफ्टनंट जर्नल रँकच्या अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live