गांधी कुटुंबियांच्या अडचणी वाढल्या, केंद्रीय गृहमंत्रालयाने केली घोषणा

साम टीव्ही
बुधवार, 8 जुलै 2020
  • गांधी कुटुंबियांच्या अडचणी वाढल्या
  • गांधी परिवाराशी संबंधित ट्रस्टची होणार चौकशी
  • केंद्रीय गृहमंत्रालयाने केली घोषणा

गांधी कुटुंबाशी संलग्न असलेल्या तीन चॅरिटेबल ट्रस्टची चौकशी केली जाणार आहे. तिनही ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारात अनियमितता असल्याचा आरोप आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे ? पाहा...

गांधी कुटुंबियांशी संबंधित तीन चॅरिटेबल ट्रस्टची चौकशी करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने एक मंत्रालयीन समिती स्थापन केलीय. 

राजीव गांधी फाउंडेशन, राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट या तीन सेवाभावी संस्था चौकशीच्या घेऱ्यात आहेत. यापैकी राजीव गांधी फाउंडेशन ही संस्था आरोग्य, शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान, महिला आणि बालकल्याण तसंच दिव्यांग सहाय्य या क्षेत्रात काम करते. तर राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टद्वारे महिला सशक्तीकरण आणि वंचितांच्या उद्धाराचं काम केलं जातं. याशिवाय इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टतर्फे गांधी-नेहरू विचारांचा प्रसार आणि समाजकार्य केलं जातं.

खरं तर भारत चीन तणावाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने मोदी सरकारवर टिकेच्या फैरी सुरू केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देताना गांधी परिवाराशी संलग्न असलेल्या या चॅरिटेबल ट्रस्टमध्ये चीनमधून देणग्या येत असल्याचा आरोप भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डांनी केला होता. मात्र काँग्रेसने या आरोपाचा इन्कार केलाय. 

आता चौकशीअंती सत्य काय आहे ते यशावकाश बाहेर येईलच, पण सीमेवर शत्रू उभा असताना रंगलेली ही आरोपांची देशांतर्गत यादवी निश्चितच क्लेषदायी आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live