मुंबई: करोनाचा प्रादुर्भाव झाल्यास आर्थिक क्षमतेअभावी कोणत्याही गोरगरीब, गरजू रुग्णाला वैद्यकीय उपचारांपासून विन्मुख राहावे लागू नये यासाठी महात्मा फुले आरोग्यदायी योजनेमध्ये करोनासंबंधी उपचारपद्धतीचा समावेश करण्यात आला आहे. या आजारावरील वैद्यकीय उपचार हे श्वसनमार्गाच्या आजारांवरील उपचारांच्या गटामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. करोनाचा प्रादुर्भाव झालेल्या कोणत्याही रुग्णाला सार्वजनिक तसेच, खासगी रुग्णालयांमध्येही वैद्यकीय उपचार घेता येणार आहेत. १४ दिवसांच्या विलगीकरण प्रक्रियेचा खर्चही यामध्ये समाविष्ट केला जाणार आहे.
महात्मा फुले आरोग्य योजनेचे प्रमुख सुधाकर शिंदे यांनी ही माहिती दिली. विमा योजनांमध्ये अनेक आजारांना समाविष्ट करून घेण्यात आले आहे. करोना हा आजार भारतासाठी नवा असला तरी त्याच्या लक्षणांवर आधारिक वैद्यकीय उपचार दिले जात आहेत.
आजारामधील लक्षणामध्ये श्वास घेताना त्रास होऊ लागला तर व्हेन्टिलेटरवरही ठेवावे लागते. त्यामुळे या आजाराचा समावेश हा श्वसनमार्गाच्या आजारांशी संबधित प्रकारांमध्ये केला जाणार आहे. त्यामध्ये विलगीकरण प्रक्रियेसाठी असणारे कवचही अंतर्भूत आहे.
आणखी वाचा :: करोनाच्या गंभीर रुग्णांना HIV प्रतिबंधक औषधे
महात्मा फुले योजनेंतर्गत एक एप्रिलपासून खासगी रुग्णालयांची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. नव्या तीनशे खासगी रुग्णालयांचा समावेश करण्यात येणार आहे. या ठिकाणी सरकारी योजनेंतर्गत राखीव खाटांमध्ये गरजू रुग्णांना दाखल करून घेण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
करोनासंदर्भात आलेल्या विमादाव्यांचा प्राधान्याने विचार करण्यात यावा. विमाधारकाच्या पॉलिसीनुसार योग्य कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर विमा परताव्याचा लाभ देण्यात यावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. हे दावे संमत करण्यापूर्वी अंतर्गत तपासणी समितीच्या माध्यमातून त्यांचा विचार होईल. गरज भासल्यास भविष्यात करोना आजारांसाठी विशेषत्वाने विमाकवच देण्याचा विचार करण्यात येईल, असेही यात स्पष्ट केले आहे. केवळ सार्वजनिक नव्हे तर खासगी रुग्णालयांमधून विमा संमत करणाऱ्या भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने या संदर्भात महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत
हेही वाचा :: मुंबईत एक दिवसाआड दुकानं बंद
सरकारी विमा योजनांमध्ये संसर्गजन्य आजारांचा आतापर्यंत समावेश करण्यात आलेला नाही. मलेरिया, टीबी, कुष्ठरोग तसेच, त्वचाविकारासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आरोग्य कार्यक्रम आखण्यात आले आहेत. त्याच्यासाठी निधीही राखीव ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे त्यांचे उपचार त्या अंतर्गत करण्यात येतात. परंतु करोनाचे गांभीर्य आणि संसर्गाची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
Web Title : Insurance for Corona now