इकबाल चहल हे मुंबई महापालिकेचे नवीन आयुक्त 

इकबाल चहल हे मुंबई महापालिकेचे नवीन आयुक्त 

मुंबई: मुंबई महापालिका आयुक्तपदावरून प्रवीण परदेशी यांची तडकाफडकी बदली करत त्यांच्या जागी इकबाल सिंह चहल यांची नियुक्ती करण्याचा आदेश शुक्रवारी सायंकाळी सामान्य प्रशासन विभागाने काढला. नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव पदावर कार्यरत असलेल्या चहल यांनी या आदेशाची प्रत प्राप्त होताच रात्रीच आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली. मुंबईवरील करोनाचं संकट लक्षात घेता त्यांनी तातडीने सूत्रे स्वीकारल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्य शासनाचे आदेश निघाल्यानंतर जराही वेळ न घालवता आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून इकबाल सिंह चहल यांनी रात्रीच मुंबई पालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला आहे. विशेष म्हणजे मुंबईवरील करोनाचं संकट लक्षात घेऊन चहल यांनी सूत्रे स्वीकारताच रात्री उशिरा चारही अतिरिक्त आयुक्तांसोबत बैठक घेऊन करोना साथीच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला व आवश्यक सूचना केल्याचे कळते.


चहल हे आदेशाची प्रत घेऊन मुंबई पालिका मुख्यालयात दाखल झाले. तिथे मोजक्याच अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी आयुक्तपदाचा कार्यभार हाती घेतला. यावेळी प्रवीण परदेशी उपस्थित नव्हते. यावेळी फिजिकल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. चहल यांच्यासह सारेच मास्क लावून उपस्थित होते.


मुंबईत सध्या दाट लोकवस्तीचा भाग असलेली धारावी झोपडपट्टी करोनासाठी डेंजर झोन बनली आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी या नात्याने चहल यांनी धारावीत बरंच काम केलेलं आहे. या अनुभवाचा धारावीला करोनामुक्त करण्यात निश्चितच फायदा होणार आहे. चहल यांच्यासमोर मुंबईतील करोनाची स्थिती नियंत्रणात आणण्याचे मोठे आव्हान असणार आहे. पालिकेच्या आरोग्य विभागासह सर्वच यंत्रणा करोनाविरुद्ध लढ्यात अहोरात्र सेवा देत असून या सर्वांवर अंकुश ठेवताना सक्षमपणे प्रशासन हाकण्याची जबाबदारी चहल यांच्यावर असेल. प्रशासनातील दांडगा अनुभव व शिस्तप्रिय अधिकारी अशी ओळख असल्याने चहल यांच्यावर सरकारने विश्वास टाकला आहे. 

WebTittle :: Iqbal Chahal is the new Commissioner of Mumbai Municipal Corporation


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com