मनसेकडून सिंचन भवनात तोडफोड

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

पुणे - मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी पाणीपुरवठ्याबाबत आश्‍वासन देऊनही जलसंपदा विभाग पुणेकरांच्या भावनांशी खेळत आहे. जलसंपदा विभाग ठोस निर्णय घेत नसल्याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी सिंचन भवनातील पाइपलाइनची तोडफोड केली. या घटनेनंतर समर्थ पोलिसांनी सिंचन भवनात पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. तसेच, हवेली पोलिसांनीही खडकवासला धरण परिसरात बंदोबस्तात वाढ केली आहे. 

शहराध्यक्ष अजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. मनसेच्या ३० ते ३५ कार्यकर्त्यांनी दुपारी साडेतीनच्या सुमारास मंगळवार पेठेतील सिंचन भवनात निवेदन देण्याच्या बहाण्याने प्रवेश केला. त्यानंतर कार्यालयातील पाणीपुरवठा करणारे लोखंडी पाइप उखडून टाकले. त्यामुळे पाणी वाया गेले. या इमारतीमधील कृष्णा खोरेच्या अधिकाऱ्याच्या केबिनमध्येही पाणी शिरले.  

‘‘मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी सांगूनही जलसंपदा विभाग कार्यवाही करीत नाही. धरणात पाणी कमी असेल, तर जलसंपदा विभागाने त्याचे नियोजन करून ठोस निर्णय घ्यावा. परंतु तसे होत नाही. तुम्ही जर मनमानी करणार असाल तर आम्हीही आमच्या पद्धतीने आंदोलन करू,’’ असा इशारा शिंदे यांनी दिला. खडकवासला प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार म्हणाले, ‘‘पुणे शहर आणि ग्रामीण भागाला समन्यायी पाणीवाटप झाले पाहिजे. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या निर्णयानुसार दोन पंप बंद करण्यात आले; परंतु शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात केलेली नाही. काही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गैरसमजातून हा प्रकार केला असावा.’’ 

आंदोलकांविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणी जलसंपदाच्या अधिकाऱ्याने समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून सार्वजनिक संपत्ती हानी प्रतिबंधक अधिनियमानुसार आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण वायकर यांनी दिली.

सरकारी मालमत्ता नागरिकांच्या करातून उभी राहते. नागरिकांच्या पैशांतून उभ्या राहिलेल्या मालमत्तेची मोडतोड करून पुणे शहराचा पाणी प्रश्न कसा सुटणार? प्रश्न सोडविण्याचे मार्ग काय असावेत?... आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा.

Web Title:  irrigation Bhavan broke from MNS

संबंधित बातम्या

Saam TV Live