राज्यात थंडी ओसरली

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 21 जानेवारी 2020

राज्यात सर्वत्र किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदला गेला. राज्यात नीचांकी तापमान जळगाव येथे (११.४ अंश सेल्सिअस) नोंदले असल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. 

पुणे - उत्तरेतून येणाऱ्या थंड वाऱ्याच्या प्रवाहांचा प्रभाव कमी झाल्याने राज्यातून सोमवारी थंडीने काढता पाय घेतला. राज्यात सर्वत्र किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदला गेला. राज्यात नीचांकी तापमान जळगाव येथे (११.४ अंश सेल्सिअस) नोंदले असल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. 

काश्‍मीर खोऱ्यात हिमवृष्टी सुरू आहे. तसेच, उत्तर भारतात बहुतांश ठिकाणी थंडीची लाट पसरली आहे. मात्र, उत्तर भारतातून महाराष्ट्राच्या दिशेने वाहणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव कमी झाला आहे, त्यामुळे राज्यातील थंडी कमी झाल्याचे निरीक्षण हवामान खात्याने नोंदविले आहे. 

उत्तरेतील वाऱ्याचा प्रभाव वाढल्याने गेल्या आठवड्यात मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट निर्माण झाली होती. पण, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून राज्याच्या दिशेने वाहत असलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे उत्तरेतील थंड वाऱ्याचा प्रभाव कमी झाला आहे. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत अंशतः वाढ झाली. राज्यात पुढील चार दिवस कोरडे हवामान राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. 

शहरात गेल्या चार दिवसांपासून सातत्याने किमान तापमानाचा पारा वाढत आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारी हंगामातील नीचांकी म्हणजे ८.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर प्रत्येक दिवशी तापमान वाढल्याचे निरीक्षण हवामान खात्याने नोंदवले. गेल्या ७२ तासांमध्ये किमान तापमानाचा पारा ५.६ अंश सेल्सिअसने वाढला. पुढील दोन दिवसांमध्ये किमान तापमान १५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढणार असल्याचेही खात्यातर्फे सांगण्यात आले. 

आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्‍यता आहे. सकाळी तुरळक भागात धुके पडणार असून, किमान तापमान १४ ते १५ आणि कमाल तापमान २९ ते ३० अंश सेल्सिअस नोंदले जाईल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे. 

Web Title: less cold wave in the state


संबंधित बातम्या

Saam TV Live