आता कोरोनावर मात करण अशक्‍य! आयएमएचा इशारा

साम टिव्ही
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

दिवाळीसोबत वाढणारी थंडी ही कोरोना रुग्णांसाठी घातक ठरू शकते. त्यामुळे यंदा नागरिकांनी फटाके उडविणे टाळावे. सध्या थंडीमुळे प्रदूषण जमिनीलगत असल्याने न्यूमोनियासारख्या आजाराला आमंत्रण मिळू शकते.

गणेशोत्सवानंतर कोरोना रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाली. त्यातून कोणताही बोध न घेता दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. सुरुवातीच्या काळात मास्क, सॅनिटायझर हिरिरीने वापरणारे नागरिक आणि दुकानदार नियमावलीचे उल्लंघन करण्यात धन्यता मानू लागले आहेत

मुंबई  : कोव्हिड आजार जणू शहरातून हद्दपार झाल्याच्या आवेशात नागरिक दिवाळीच्या खरेदीसाठी गर्दी करत आहेत. यामुळे पालिकेसमोर कोरोना संसर्ग रोखण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. पालिकेने रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता अनेक उपाययोजना केल्या असल्या, तरी नागरिकांनी स्वत: शिस्तीने वागण्याची गरज आहे. नागरिकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास डिसेंबरमध्ये येणारी कोरोनाची दुसरी लाट टाळणे अशक्‍य असल्याचा इशारा आयएमएचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिला आहे.

गणेशोत्सवानंतर कोरोना रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाली. त्यातून कोणताही बोध न घेता दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. सुरुवातीच्या काळात मास्क, सॅनिटायझर हिरिरीने वापरणारे नागरिक आणि दुकानदार नियमावलीचे उल्लंघन करण्यात धन्यता मानू लागले आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या वाढण्यासोबत दुसरी लाट येण्याची शक्‍यता डॉ. भोंडवे यांनी व्यक्त केली.

दिवाळीसोबत वाढणारी थंडी ही कोरोना रुग्णांसाठी घातक ठरू शकते. त्यामुळे यंदा नागरिकांनी फटाके उडविणे टाळावे. सध्या थंडीमुळे प्रदूषण जमिनीलगत असल्याने न्यूमोनियासारख्या आजाराला आमंत्रण मिळू शकते. तसेच फटाक्‍याच्या धुराने प्रदूषणाची पातळी वाढू शकते. त्यामुळे कोरोना होऊन गेलेल्या आणि आजारावेळी व्हेंटिलेटर, आयसीयू आणि ऑक्‍सिजनची गरज लागलेल्या रुग्णांना त्रास होऊ शकतो, असेदेखील डॉ. भोंडवे यांनी सांगितले. दिवाळीच्या खरेदीसाठी शक्‍यतो बाहेर पडू नये. गर्दीच्या वेळा आणि ठिकाणे टाळावीत, असे आवाहनही डॉ. भोंडवे यांनी केले.

सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळण्याचे आणि अनलॉक उघडताना सामाजिक जबाबदारी झिडकारण्याचे परिणाम सध्या युरोप खंडात दिसत आहेत. पाश्‍चात्त्य देशांतील नागरिकांनी जी चूक केली, त्या चुकीची पुनरावृत्ती आपल्यासाठी जीवघेणी ठरू शकते; तरी आजही काही जण दुसऱ्या लाटेची खिल्ली उडवतात; मात्र कोणत्याही विषाणूला थंडीत जोर येत असतो, त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

संसर्गवाढीसाठी थंडी पोषक
दुसरी लाट येण्यासाठी वाढणारी थंडी आणि दिवाळी हे कारण ठरू शकते. कोरोना विषाणूचा संसर्ग फैलावण्यास मानवी शरीर हे माध्यम आहे. त्यात थंडी संसर्ग वाढण्यास पूरक ठरू शकते, असे डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले आहे. हिवाळ्यात सर्दी, खोकला, ताप यांसारखे विषाणूजन्य आजार वाढतात. यातून संसर्ग अधिक वाढण्याची शक्‍यता आहे. हिवाळ्याच्या तुलनेत उन्हाळ्यात विषाणूला जोर कमी असतो; मात्र थंडीत सर्दी, पडसे-ताप कोणालाही होऊ शकतो. अशापैकी 30 टक्के रुग्णांना कोरोना विषाणू संसर्ग झाल्यास गंभीर स्थिती उद्भवू शकते, असा इशारा डॉ. भोंडवे यांनी दिला आहे.

संसर्ग वाढल्यास पालिकाही तयार असून सध्या कोव्हिड सेंटरमध्ये 80 टक्के खाटा रिकाम्या आहेत. आयसीयू बेड ऑक्‍सिजनचा पुरवठा, चाचणीसंख्या वाढविण्यावर भर दिलेला आहे. विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी पालिकेने मार्शलची नेमणूक केलेली आहे; मात्र कारवाईपेक्षा नागरिकांनी स्वत: सरकारी निर्देशांचे पालन करून पालिकेला सहकार्य केल्यास कोरोनासाठी सज्ज केलेली यंत्रणा वापरण्याची गरज भासणार नाही - सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, पालिका

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live