भाजपच्या हातून  झारखंड  निसटलं

भाजपच्या हातून  झारखंड  निसटलं

रांची: झारखंड विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले आहेत.भाजपला या निकालांत मोठा धक्का बसला असून भाजपचे संख्याबळ २५ पर्यंत घसरलेच शिवाय राज्यातील सत्ताही भाजपच्या हातून निसटली आहे. दरम्यान, हेमंत सोरेन हे राज्याचे पुढचे मुख्यमंत्री असतील हे निश्चित झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यशाबद्दल सोरेन यांचे अभिनंदन केले आहे. दुसरीकडे पराभवाची जबाबदारी स्वीकारत रघुवर दास यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला आहे. विधानसभेच्या सर्व ८१ जागांचे निकाल प्रदीर्घ मतमोजणीनंतर रात्री उशिरा हाती आले असून झारखंड मुक्ती मोर्चा-काँग्रेस-राष्ट्रीय जनता दल या तीन पक्षांच्या आघाडीने ४७ जागांसह स्पष्ट बहुमत मिळवले आहे. 

राज्यात ३० जागा जिंकून झारखंड मुक्ती मोर्चा हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. काँग्रेसने १६ जागा जिंकल्या आहेत तर राजदने १ जागा जिंकली आहे. भाजपला गेल्यावेळचे यश कायम राखता आले नाही. २०१४ मध्ये भाजपने ऑल झारखंड स्टुडेंट्स युनियनसोबत (आजसू) आघाडी केली होती. या आघाडीला ४२ जागांसह काठावरचे बहुमत मिळाले होते. यावेळी भाजप स्वबळावर निवडणुकांना सामोरा गेला. मात्र भाजपला २५ जागांपर्यंतच मजल मारता आली.
झारखंडच्या जनतेने भाजपला नाकारत झारखंड मुक्ती मोर्चा-काँग्रेस आघाडीला स्पष्ट कौल दिला आहे. या आघाडीने ४१ हा बहुमताचा जादुई आकडा पार करत ८१ पैकी ४७ जागा जिंकल्या आहेत.

मुख्यमंत्री रघुवर दास यांनाही विजय मिळवता आला नाही. जमशेदपूर पूर्व मतदारसंघातून भाजपचे बंडखोर उमेदवार सरयू राय यांनी रघुवर दास यांचा पराभव केला. दुसरीकडे झारखंड मुक्ती मोर्चाची धुरा सांभाळणारे हेमंत सोरेन यांनी भाजपच्या नाकीनऊ आणले. सोरेन यांनी दुमका आणि बरहेट या दोन्ही जागांवर दणदणीत विजय मिळवला. दोन्ही मतदारसंघांत त्यांनी भाजपच्या उमेदवारांना पराभवाची धूळ चारली.

झारखंडच्या निकालाचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्राप्रमाणे  पुन्हा एकदा धनुष्यबाणानेच भाजपचा वेध घेतला आहे. महाराष्ट्रात शिवसेनेने भाजपला धक्का दिला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत महाविकास आघाडी स्थापन करून सेनेने भाजपला सत्तेपासून दूर ठेवले तर झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाने काँग्रेस व राष्ट्रीय जनता दलासोबत निवडणूकपूर्व आघाडी करून भाजपला सत्तेतून खाली खेचले. 

Marathi News : Jharkhand escaped from BJP's hands


 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com