डीन जोन्सचं जाणं हे जितकं चटका लावणारं होतं तितकच वैद्यकशास्त्रातल्या विज्ञानाची मर्यादा स्पष्ट करणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्यापैकी एक होतं.कार्डिऍक ऍरेस्ट मध्ये हृदयातल्या चेतना- स्नायू पेशीतील(Nodes)विद्युत लहरीचे वहन अचानक थांबतं. ते fatal झालं नाही तर बरं असतं.जोन्सच्या बाबतीत नको ते घडलं.
डीन जोन्सला पहिल्यांदा 1985 च्या वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ क्रिकेट मधल्या भारत ऑस्ट्रेलिया सामन्यात पहिल्यांदा पाहिलं होतं.रॉबि कर आणि डीन जोन्स असे दोन नवे खेळाडू त्या सामन्यात पहायला मिळाले होते.त्या सामन्यात दोघांनाही छाप पाडली नव्हती.नंतर मात्र डीन जोन्सनी भारताला अनेक सामन्यात अतोनात छळलं. छळलं ह्या अर्थानी की तो मोठ्या धावांचा रतीब तर घालायचाच आणि क्षेत्ररक्षकांना भयंकर तणावाखाली ठेवायचा.He was a damn irritating batsman. 1985 नंतर बॉब सिम्पसन ने ऑस्ट्रेलिया क्रिकेट मध्ये जिंकण्यासाठी जी नवी सिस्टिम आणली त्यात एक धावेची दोन करणे हे फिल्डर्सला जेरीस आणण्याचे तंत्र आणले.बून,मार्श आणि जोन्स,वेलेटा,मॅथ्यूस ह्या लोकांनी ह्या पद्धतीने फिल्डर्स चे मानसिक खच्चीकरण केले. जोन्स कडे boundary क्लीअर करण्याची ताकद होती. त्याचा बॅटस्विंग पोतराजासारखा होता.पोतराज जसा उजव्या खांद्याकडून चाबूक फिरवून डाव्या खांद्याच्या मागे मारतो तसा जोन्स थर्ड मॅन कडून बॅट घेऊन स्क्वेअर लेगला न्यायचा. Arms नी खेळत असला तरी तो सेहवागसारखा जागेवरून आर्म्स नी प्रहार करत नसे.त्याला फुटवर्क ची जोड होती.हे त्याचं वेगळेपण होतं. बाकी चिकाटी,व्हिजिगिशु वृत्ती,विन ऍट ऑल कॉस्ट हे सगळे ऑस्ट्रेलियन गुण त्याच्यात होते हे मद्रास टाय टेस्ट आणि इतर अनेक उदाहरणावरून दिसून आलेले होते. एकदिवसीय आणि कसोटीत 45 च्या सरासरीने धावा करणे ही मोठ्या कर्तबगारीची खूण आहे.प्रथम श्रेणीत 19 हजार धावा ही काही खायची गोष्ट नाही. त्याच्या जास्त आणि बिनधास्त व्यक्त होण्याच्या स्वभावाने ,कधी बेभरवशी फलंदाजीने त्याला ऑस्ट्रेलियन बोर्डाने 52 च्या वर कसोटी सामने खेळू दिले नाहीत.
जोन्स घराघरात पोचला निवृत्तीनंतर. समालोचक, मार्गदर्शक,कोच,व्यवस्थापक म्हणून. भारतीय उपखंडाने त्याला दत्तक घेऊन टाकले.पाकिस्तान मध्ये आणि अफगाणिस्तानात कोच म्हणून तर भारतात समालोचक म्हणून तो अफाट लोकप्रिय झाला.तो 24 तास क्रिकेटचाच विचार करत असे.जोन्सचे क्रिकेटशी असे अद्वैत होते की तो उभा राहिला तर सावली क्रिकेटची पडेल.ऑस्ट्रेलियात पाकिस्तानी खेळाडूंना प्रमोट कर,पाकिस्तानच्या घरेलू क्रिकेटच्या समस्यांवर सतत चिंतन कर ह्याने तो व्यापला होता. भारतात त्याने TV प्रेझेन्टेर म्हणून जी लोकप्रियता मिळवली तशी कुणाला मिळाली नसेल.तो क्रिकेट सादरीकरणात 'गमत्या' ह्या रुपात लोकांसमोर आला. क्रिकेट समालोचनात नर्म विनोद करणे,किस्से सांगणे असे बरेच समालोचक करतात.पण गमत्या होण्याकरता तुमचा स्वभाव तसा लागतो.गमत्या लोकांचा भावनांक वेगळा असतो.ते नैसर्गिक असतात.टोनी ग्रेग ,हेन्री ब्लॉफेल्ड अतिशयोक्तीनें, नर्म विनोदाने उपखंडात लोकप्रिय झाले.पण ते गमत्या नव्हते.जोन्स आणि इंग्लंडचा डेविड लॉइड गमत्या वर्गातले प्रेझेन्टेर.बोलण्याबरोबरच अभिनय,देहबोली तर कधी नृत्य हे काहीही करताना ते सहज असतात. त्यात काहीही ओढून ताणून वाटत नाही.प्रोफेसर डिनो म्हणूनच लोकांनी डोक्यावर घेतला. आफ्टर डिनर स्पीच मध्ये जोन्सचा हात कुणी धरू शकेल असे वाटत नाही.बूनच्या सिडनी-लंडन फ्लाईट मधला बीअरच्या 52 कॅन्स रिचवण्याचे पवित्र पुराण ज्याने जोन्स कडून ऐकले नाही त्याचे वर्ल्ड कप फायनल च्या तिकिटांच्या रांगेत खिडकीपाशी नंबर आल्यावर तिकिटे संपावी इतके वाईट नशीब म्हणले पाहिजे.
नुसते क्रिकेटला वाहून न घेता सतत हा खेळ अजून आकर्षक कसा होईल, कोणत्या नवीन गोष्टींचे प्रयोग करता येते ह्याचा अहोरात्र ध्यास त्याला होता.भारतात आय.सी.एल.लीगचा एक थिंक टॅंक तो सुद्धा होता. पाकिस्तानी खेळाडूची मुलगी दुर्धर आजाराने ग्रासली आहे कळताच पाकिस्तान मधल्या डॉक्टर मित्राला फोन करून त्याने तिच्या जीवाची भीक मागितली होती.जागतिक सगा सोयरा होता डीन जोन्स.
35 वर्षे जोन्सचा प्रवास जवळून पहायला मिळाला होता.कोणत्याही रम्य आठवणीत रमताना सुरुवात आपोआप वन्स अपॉन अ टाईम अशी होते.डीन च्या स्मृतीत रमताना मी कायम 'जोन्स अपॉन अ टाईम' अशीच सुरुवात करेन. Badly miss you Deano.