ज्योतिरादित्यांचा राजीनामा आणि काँग्रेसची माधवराव शिंदेंना आदरांजली

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 10 मार्च 2020

 ज्योतिरादित्य यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली, तिन्ही नेत्यांमध्ये जवळपास एक तास ही चर्चा झाली. त्यामुळं आता ज्योतिरादित्य सिंधिया भाजपात प्रवेश करणार आहेत.

नवी दिल्ली : काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्या बंडखोरीनं मध्य प्रदेश सरकार धोक्यात आलयं. मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मंत्र्यांचे राजीनामे मागितले आहेत. सरकार कोसळणार हे निश्चित झाले आहे. एकेकाळी काँग्रेसचे निष्ठावंत समजले जाणारे, ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला राम राम करून, भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आज, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली, तिन्ही नेत्यांमध्ये जवळपास एक तास ही चर्चा झाली. त्यामुळं आता ज्योतिरादित्य शिंदे यांचा भाजप प्रवेश याची केवळ औपचारिकताच राहिली आहे. ताज्या अपडेट्स नुसार ज्योतिरादित्य यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.

 

काँग्रेसचे निष्ठवंत म्हणून, ज्योतिरादित्य शिंदे यांची ओळख होती. पण, मुख्यमंत्री कलमनाथ आणि ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांच्यात असलेले मतभेद टोकाला गेल्यामुळं अखेर त्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला. गेल्या काही आठवड्यांपासून ही खद् खद सुरू होती. गेल्या आठवड्यात काँग्रेसचे 11 आमदार बेपत्ता झाल्याची चर्चा होती. पण, त्यातील नऊ आमदार टप्प्या टप्प्याने माघारी आले. काल सायंकाळी मात्र, काँग्रेसचे 15 ते 17 आमदार, बेंगळुरूला निघून गेल्याची चर्चा सुरू झाली. त्याचवेळी ज्योतिरादित्य शिंदे यांची भाजपमधील बड्या नेत्यांशी चर्चा सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यामुळं काल रात्रीच ज्योतिरादित्य शिंदे यांचा भाजपप्रवेश होणार हे निश्चित झाले होते. आज, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन एक तास चर्चा केली.

दरम्यान, आज ज्योतिरादित्य शिंदे याचे वडील माधवराव शिंदे यांची जयंती. यानिमित्तानं काँग्रेसने त्यांना आदरांजली वाहिली. माधवराव काँग्रेसचे निष्ठावंत त्यांनी केंद्रात रेल्वेमंत्री म्हणूनही काम केले होते. नऊ वेळा खासदार होण्याचा पराक्रम त्यांनी केला होता. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचे जवळचे मित्र म्हणूनही त्यांची काँग्रेसमध्ये वेगळी ओळख होती. आज, त्यांची जयंती असल्यामुळं काँग्रेसने त्यांच्या अधिकृत पेजवरून त्यांना आदरांजली वाहिली आहे. एका बाजुला ज्योतिरादित्यांचे बंड आणि दुसरीकडे त्यांच्या वडिलांची जयंती. जयंतीनिमित्त काँग्रेसनं वाहिलेले आदरांजली, असा योगायोग जुळून आलाय. 

Web Title- Jyotiraditya scindia resignation.

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live