'ऐ उद्धव ठाकरे' म्हणून मुख्यमंत्र्यांचा अपमान करणारी कंगना कायद्याच्या कचाट्यात, वाचा काय घडलंय?

साम टीव्ही
गुरुवार, 10 सप्टेंबर 2020

 

  • ठाकरेंशी पंगा, कंगना विरोधात गुन्हा
  • मुख्यमंत्र्यांचा अपमान करणाऱी कंगना कायद्याच्या कचाट्यात 
  • कंगनाच्या वादात राज्यपालांनीही घेतली उडी

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी भाषेत उल्लेख करणं तसच वारंवार चिथावणीखोर भाषा वापरणं कंगनाला चांगलंच भोवणारंय. कारण कंगनाविरोधात आता मुंबईत पोलिसात FIR दाखल करण्यात आलीय तर दुसरीकडे कंगना प्रकरणात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीदेखील उडी घेतलीय. 

वारंवार विखारी भाषा वापरून राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान करणारी कंगना राणावत आता मात्र चांगलीच अडचणीत सापडलीय. कंगनाविरोधात विक्रोळी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुख्यमंत्र्यांचा अपमान केल्याप्रकरणी तक्रारकर्त्यांनं कंगनावर कडक कारवाई करण्याची मागणी केलीय. 

कंगना आणि शिवसेनेतला वाद विकोपाला गेलाय. इतका की मुंबई महापालिकेनं लागलीच कंगनाच्या अवैध बांधकामावर हातोडा फिरवून ते बांधकाम भुईसपाट केलं मात्र तरीही कंगनाची ट्विटरवरून टिवटिव सुरूच आहेत. कंगनानं पुन्हा ट्विट करून शिवसेनेवर निशाणा साधलाय.

शिवसेना आता सोनिया सेना झालीय अशी टीका तिनं केलीय. तुमच्या वडिलांची चांगली कर्म तुम्हाला संपत्ती देऊ शकते. मात्र सन्मान तुम्हाला स्वत:ला कमावावा लागणार आहे. तुम्ही केवळ एक वंशवादाचा नमुना आहात अशी गरळही तिनं मुख्य़मंत्री ठाकरेंविरोधात ओकलीय. 

कंगना विरूद्ध शिवसेना हा संघर्ष तापलेला असतानाच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीही या वादात उडी घेतलीय. कंगनाच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईबाबत राज्यपालांनी नाराजी व्यक्त केलीय. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजॉय मेहता यांच्याकडे त्यांनी ही नाराजी व्यक्त केलीय. राज्यपाल याबाबतचा अहवाल केंद्राला पाठवणार असल्याची माहिती आहे. 

कंगना विरूद्ध शिवसेना या वादात नेमकं कोण चुकीचं आणि कोण बरोबर यावरून समर्थक आणि विरोधकांमध्ये धुमश्चक्री उडालीय. पण कंगनानं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान करणं कितपत योग्य आहे. अन्याय झालाय असं वाटत होतं मग कायद्याचा मार्ग सोडून फुकाची टिवटिव कशासाठी ? घरात बसून नसत्या वादाला फोडणी देणाऱ्या कंगनानं आपल्या जीभेवरही ताबा ठेवायला हवा अशा प्रतिक्रिया राज्याच्या कानाकोपऱ्यातून उमटू लागल्या आहेत. 


संबंधित बातम्या

Saam TV Live