कोल्हापूरमधील गायमुख तलावाच्या भिंतीला गळती

कोल्हापूरमधील  गायमुख तलावाच्या भिंतीला गळती

 जोतिबा डोंगराच्या पायथ्याशी असणारा पुष्करणी नावाचा तलाव म्हणजे गायमुख तलाव. गायीच्या आकारासारखा तो दिसतो म्हणून त्याला गोमुख किंवा गायमुख तलाव हे नाव प्राचीन काळापासून पडले. पन्नास वर्षांपासून चैत्र यात्रेसह तो जोतिबा ग्रामस्थांची तहान भागवतो आहे. यंदा अतिवृष्टीमुळे तलाव कमकुवत झाला आहे. त्यामुळे या तलावाची शासकीय यंत्रणेने तातडीने डागडुजी करणे आवश्‍यक आहे. 

या तलावाच्या दक्षिण बाजूच्या भिंतीस तडे गेले असून त्यातून पाणी पाझर पद्धतीने मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहे. तलावाशेजारी असणाऱ्या जॅकवेलच्या इमारतीसही मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत. काही ठिकाणी भिंतींची पडझड झाली आहे. डोंगर पठार खचून माती मोठ्या प्रमाणात या तलावात आली आहे. परिणामी या तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे.

 त्यामुळे या तलावाच्या भिंतींना तातडीने सपोर्ट करणे गरजेचे आहे. या गायमुख तलावाच्या खाली नवीन पाणीपुरवठा योजनेचे जॅकवेल बांधले असून त्यासही धोका निर्माण झाला आहे. सध्या गायमुख तलाव पूर्ण काठोकाठ भरला असून पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साचलेला आहे. त्यामुळे या भिंतीवर दाब येऊन गायमुख तलाव फुटण्याची भीती व्यक्त होत आहे. डोंगरावर यंदा मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली. त्यामुळे तो आठ दहा दिवस ओसंडून वाहिला. त्यामुळे त्याच्या भिंती कमकुवत झाल्या आहेत.

जोतिबा चैत्र यात्रा तसेच जोतिबा ग्रामस्थ पुजाऱ्यांना गेल्या पन्नास वर्षांपासून हा तलाव आधारवड आहे. तो जोतिबा गावचे वैभव आहे. या तलावाच्या डागडुजीसाठी शासकीय यंत्रणांनी तातडीने मदत करणे गरजेचे आहे. दरम्यान, केर्ली (ता. करवीर) येथील कासारी नदीतून थेट पाणी पाईपलाईनद्वारे या गायमुख तलावात सोडले आहे. तसेच या तलावात भरपूर जिवंत झरेही आहेत. तेथून ते डोंगरावर असणाऱ्या पाण्याच्या टाकीत पंपाद्वारे सोडले आहेत. तेथून  ते शुद्ध होऊन सायपन पद्धतीद्वारे संपूर्ण गावात नळाला सोडले जाते.

जोतिबा डोंगरावर ३६० पाण्याचे झरे असून हे सर्व जिवंत झरे आजही पाहण्यास मिळतात. पूर्वी गायमुख तलाव नव्हता, तेव्हा ग्रामस्थ भाविक हे नागझरी कापूरभाव देवभाव या तलावातील पाण्याचा वापर करीत. कालांतराने यात्रेची व्याप्ती वाढली. गायमुख तलाव नूतनीकरण करून ते पाणी डोंगरावर आणले आणि गायमुख हा जोतिबा डोंगर ग्रामस्थ पुजाऱ्यांचा आधारवड ठरला.

सध्या जोतिबा डोंगरावरील कापूर बाव तलाव यंदा स्वच्छ करण्यात आला असून त्यातील पाणीही स्वच्छ आहे. त्यातून काही दिवस पाणी स्वच्छ करून पाण्याच्या टाकीत सोडता येईल आणि गायमुख तलावाची डागडुजी करण्यास काही अडचण येणार नाही, असे काही ग्रामस्थांनी सांगितले.

 Web Tittle : Leakage to Jotiba Dongar GayMukh pond wall

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com