दाणेदार युरिया खताऐवजी आता शेतकऱ्यांना लवकरच लिक्विड नॅनो युरिया उपलब्ध होणार 

liquid nano uria.jpg
liquid nano uria.jpg

औरंगाबाद : दाणेदार युरिया खताऐवजी आता शेतकऱ्यांना लवकरच लिक्विड नॅनो युरिया उपलब्ध होणार आहे. ११ हजार शेतकऱ्यांच्या शेतात चाचणी घेऊन इफ्कोने रासायनिक खताच्या व्यवस्थापनात मोठी क्रांती केलीय. या नव्या शोधामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, शिवाय पर्यावरण संतुलनाला मोठा हातभार लागणार आहे.  आपल्या देशात युरिया खताची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. (Liquid nano urea will soon be available to farmers instead of granular urea fertilizer) 

मागच्या वर्षी तर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी युरीयासाठी शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागलं. यापुढच्या काळात तशी गरज भासणार नाही, असे संशोधन इंडियन फार्मर्स फर्टिलायझर को-ऑपरेटिव्ह लिमिटेड म्हणजेच इफ्कोने केलंय. कारण इफ्कोने लिक्विड नॅनो युरियाचा शोध लावलाय. या शोधामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय, तर पर्यावरण प्रदूषणाला खीळही बसणार आहे. 

देशात ३५ दशलक्ष टन युरिया लागतो. त्यासाठी केंद्र सरकारकडून ६०० कोटींची सबसिडी आहे. मोठ्या प्रमाणात युरियाचा वापर झाल्याने जमीन खराब होत असल्याचे निष्कर्ष अनेकदा समोर आलेत. त्यामुळे याला पर्याय म्हणून इफ्कोने गुजरातमध्ये इफ्को जैव नॅनो तंत्रज्ञान संशोधन केंद्र सुरु करून जगातील पहिला लिक्विड नॅनो युरिया तयार केलाय. देशातील वेगवेगळ्या भागासोबत महाराष्ट्रातही या लिक्विड नॅनो युरियाच्या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत.  अशी माहिती कृषीतज्ञ डॉ. उदय देवळाणकर यांनी दिली आहे. 

जमीन कोरडवाहू असो की बागायती, दोन्हीसाठी शेतकरी दाणेदार खताचा वापर करतात. त्यात दाणेदार युरिया मोठ्या प्रमाणात वाया जातो. युरियाच्या अतिवापराने पर्यावरणाला मोठी हानी पोहोचते. त्यामुळे दाणेदार युरियाला पर्याय म्हणून इफ्कोने नॅनो युरिया आणला. एरवी दाणेदार युरियाची गोणी वाहून नेणे ही शेतकऱ्यांना मोठी समस्या असते. पण नॅनो युरियाची बाटली शेतकऱ्यांना सहजपणे घेऊन जाता येईल. शास्त्रज्ञांनी अर्धा लिटर नॅनो युरियात ४० हजार पीपीएम इतके नायट्रोजन टाकले आहे. यामुळे ५० किलो गोणीतील दाणेदार युरिया इतके नत्र पिकाला मिळेल.

शिवाय, दाणेदार युरियापेक्षा १० टक्क्यांनी नॅनो युरिया स्वस्त आहे.  या तंत्रज्ञानाचा प्रसार झपाट्याने झाल्यास देशातील पारंपरिक युरियाचा वापर ५० टक्क्यांनी घटू शकतो.   तर  आयसीएआरच्या २० संशोधन संस्था, विविध कृषी विद्यापीठे आणि कृषी विज्ञान केंद्रांवर एकूण ४३ पिकांवर नॅनो युरियाच्या चाचण्या यशस्वी ठरल्या आहेत. याशिवाय ११ हजार शेतकऱ्यांच्या ९४ पिकांवरही चाचण्या यशस्वीपणे पार पडल्या.  त्याच्या वापरामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात आठ टक्क्यांपर्यंत वाढ होईल, असा दावा इफ्कोने केला आहे.

तसेच,  युरिया वापरणाऱ्या शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाचे होणारे फायदे अभूतपूर्व स्वरूपाचे असतील, दाणेदार युरियाच्या जादा वापरातून प्रदूषण वाढते. मातीच्या आरोग्यास हानी होते. कीड-रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते. तसेच पिकाचीदेखील हानी होते. नॅनो युरिया आता पर्यावरणपूरक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे. नॅनो युरियाचे उत्पादन येत्या दोन महिन्यांत सुरू होईल व ऑगस्टच्या आसपास शेतकऱ्यांना तो उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पाठीवर गोनी वाहून नेण्यापेक्षा छोटीशी लिक्विड नॅनो युरिया बाटली फायदेशीर ठरेल, असेही डॉ. उदय देवळाणकर, यांनी म्हटले आहे. 
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com