Loksabha 2019 : 'अडवानी यांचे तिकीट कापलेले नाही तर…'

Loksabha 2019 : 'अडवानी यांचे तिकीट कापलेले नाही तर…'

नवी दिल्लीः भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठीची 20 राज्यांतील 184 उमेदवारांची पहिली यादी गुरुवारी (ता. 21) जाहिर झाल्यानंतर पक्षाचे भीष्माचार्य लालकृष्ण अडवानी चर्चेत आले होते. सोशल मीडियावर त्यांचा पत्ता कट झाल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. परंतु, अडवानी आमचे प्रेरणास्थान असून त्यांचे तिकीट कापण्यात आले नाही तर वाढते वय आणि प्रकृतीच्या कारणामुळे संसदीय समितीने हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती केंद्रिय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीर केलेल्या यादीत लालकृष्ण अडवानी यांना स्थान नव्हते. लालकृष्ण अडवानी यांच्या गांधीनगर मतदार संघातून भाजपने राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना उमेदवारी दिल्याने अडवानी यांच्या राजकीय पर्वाचा अस्त झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावरही नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत होते.

गडकरी म्हणाले, 'अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवानी आमचे प्रेरणास्थान आहेत. पक्षातील प्रत्येकाच्या मनात त्यांच्याबद्दल आदर असून, तिकीट कापले म्हणून त्यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष केले असे होऊ शकत नाही. प्रत्येक पक्षात परिवर्तन होत असते आणि हा त्याचाच एक भाग आहे. वाढते वय आणि प्रकृतीच्या कारणामुळे संसदीय समितीने लालकृष्ण अडवानी यांना तिकीट न देण्याचा निर्णय घेतला आहे.'

दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून, यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी, राजनाथ सिंह, अमित शाह यांना स्थान मिळाले आहे. मात्र, 1998 पासून गांधीनगर मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अडवानी यांच्या ऐवजी भाजपने या मतदार संघातून अमित शाह यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे 91 वर्षीय अडवानी यांना सक्तीची निवृत्ती दिल्याची सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर गडकरी यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

भाजपमध्ये पूर्वी अटल बिहारी वाजपेयींच्या खालोखाल अडवानींचे स्थान होते. भाजपाच्या राजकीय प्रवासात अडवानी यांचे मोलाचे योगदान होते. 1991 मध्ये पहिल्यांदा गांधीनगरमधून निवडून आल्यानंतर अडवानी यांनी रथयात्रा काढली होती. राम मंदिरसाठी त्यांनी ही रथ यात्रा काढली होती आणि या रथयात्रेने भारतीय राजकारणाची दिशा बदलली होती. 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून निवड झाली आणि अडवानी याचे पंतप्रधानपदाचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. अडवानी यांनी स्वतः यंदाची निवडणूक लढवणार नाही, अशी भूमिका घेतल्याची माहिती पुढे येत आहे. पण, अडवानी यांनी त्यांचा मुलगा किंवा मुलीला उमेदवारी मिळावी, अशी इच्छा असल्याचे समजते. अडवानी यांना आता दुसऱ्या मतदार संघातून उमेदवारी दिली जाते की त्यांच्या कुटुंबातून कोणाला संधी दिली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title:loksabha 2019 bjp due to increasing age and heath issue ticket decline to lk advani informs says nitin gadkari

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com