गडकरी, पटोलेंचे शक्तिप्रदर्शन;उमेदवारी अर्ज केले दाखल

गडकरी, पटोलेंचे शक्तिप्रदर्शन;उमेदवारी अर्ज केले दाखल

नागपूर - नागपूर, रामटेक लोकसभा मतदारसंघांतील निवडणुकीसाठी उद्या अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून, सर्वच इच्छुक जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी करतील. भाजप  व काँग्रेस या प्रतिस्पर्धी पक्षाचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी खासदार नाना पटोले, पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

यानिमित्त  उभय नेते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढून शक्‍तिप्रदर्शन करतील. शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने व नाट्यमयरीत्या रामटेक येथून काँग्रेसची उमेदवारी मिळविणारे किशोर गजभियेही उद्या अर्ज दाखल करतील.

लोकसभा निवडणुकीची धामधूम खऱ्या अर्थाने उद्यापासून सुरू होणार आहे. उद्या जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज भरणाऱ्यांची मोठी गर्दी उसळण्याची शक्‍यता आहे. ११ एप्रिल रोजी मतदान होऊ घातलेल्या नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी उद्या, २५ मार्च रोजी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने उद्या सकाळी ९ वाजता संविधान चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आगेकूच करतील. यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याचे आवाहन शहर व जिल्हा भाजप तसेच शिवसेनेने कार्यकर्त्यांना केले. त्यामुळे संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली निघण्याची शक्‍यता आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाने खासदार कृपाल तुमाने यांना अर्ज दाखल करण्यासाठी सकाळी ११.०४ मिनिटांची तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना ११.०५ मिनिटांची वेळ दिली  आहे. त्यामुळे जवळपास दोन तास मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याने एकप्रकारे शक्‍तिप्रदर्शन दाखविले जाणार आहे. काँग्रेसचे नागपूरचे उमेदवार माजी खासदार नाना पटोले, किशोर गजभियेही अर्ज दाखल करणार असून १० वाजता बिशप कॉटन शाळा मैदानात कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन शहर काँग्रेसतर्फे करण्यात आले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काँग्रेसनेही बिशप कॉटन शाळा मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी जाण्याचा निर्णय घेतला असल्याने एकप्रकारे रॅलीचेच स्वरूप येणार आहे. त्यामुळे युती व आघाडीच्या उमेदवारांचे शक्‍तिप्रदर्शन दिसून येईल.

बसपसह लिंबूटिंबू पक्षाचे उमेदवारही रिंगणात 
नागपूर लोकसभेसाठी आतापर्यंत ११ तर रामटेक लोकसभेसाठी २, असे एकूण १३ जणांनी अर्ज दाखल केले. अद्याप बसपने उमेदवार जाहीर केले नसले तरी उद्या सकाळपर्यंत त्यांची नावे पुढे येतील. बसपसह लिंबूटिंबू पक्ष, संघटनांकडूनही इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल करतील. 

अर्ज भरताना उमेदवारासोबत चौघांना परवानगी
जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारांसोबत केवळ चौघे जण राहतील. उमेदवारासह एकूण ५ जणांनाच प्रक्रियेदरम्यान परवानगी आहे. एका उमेदवाराला जास्तीत जास्त चार अर्ज दाखल करता येईल. यावेळी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना १२ हजार ५०० तर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना २५ हजार रुपयांचे चालान भरावे लागणार आहे.

Web Title: Loksabha Election 2019 Nagpur Ramtek COnstituency Politics Form

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com