आदिवासींचा काळा भात खाल्लाय, बघा काय आहेत फायदे

आदिवासींचा काळा भात खाल्लाय, बघा काय आहेत फायदे
काळा भात

शांताराम काळे

अकोले : काळ्याभोर ओंब्या असणारा चविष्ट रूचकर, सुवासिक व आयुर्वेदीक गुणधर्म असणारा काळभात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. गावोगावी फिरूनही या वाणाचे शुद्ध बियाणे मिळणे दुरापास्त झाले आहे. तालुक्यातील शेतीचे अभ्यासक व पर्यावरणवादी रमाकांत डेरे यांनी काळभाताचा अभ्यास करून त्याचे संवर्धन करण्याचा निर्णय घेतला आहे.

अकोले तालुक्यातील आदिवासी भागात भात पीक शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. भात हे या मातीतील मुख्य पीक आहे. आदिवासी भागाचे जीवनरेखा भात पीकावर अवलंबून असते. अनेक पारंपरीक व दार वाण या भागातील शेतकरी वर्षानुवर्षे येथे लागवड करीत आले आहेत.

डोल, रायभोग, चिमणसाळ, जिरवेल, लाल भात, इंद्रायणी हे त्यापैकीच काही वाण. परंतु या सर्व वाणामध्ये सर्वोत्तम असणारा काळभात म्हणजे भातामध्ये एक उत्कृष्ट नैसर्गिक देणगीच. या वाणाची लागवड शक्यतो घरी खाण्यासाठीच येथील शेतकरी करत त्यामुळे बाजारात विक्रीस हा वाण फारसा उपलब्ध होत नाही. (Black rice has many health benefits)

काळा भात
राळेगणसिद्धीत सफरचंदाची बाग, पंधराच गुंठ्यात १० लाख!

या भाताचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने त्यांनी गावोगावी जाऊन भात शेतांना भेटी दिल्या. त्यांना केळुंगण या गावात सर्वोत्कृष्ट व जातीवंत काळभात पाहण्यास मिळाला. त्याचे बियाणे त्यांनी संवर्धनासाठी घेतले. आपल्या चितळवेढे येथील शेतात त्यांनी या बिया ९ बाय ८ इंच अंतरावर एका जागी तीन बिया लागवड केल्या. ही लागवड कायम स्वरुपी जागी केल्याने रोपे उपटून लागवड करण्याची गरज पडली नाही. वेळेत तण निवारण, सेंद्रीय खतांचा वापर व भुईमूग पिकाच्या लागवडीमुळे त्यांचेकडे काळभात उत्कृष्टपणे आला आहे. दर्जेदार बियाणे तयार झाल्यानंतर हे बीज तालुक्यातील शेतकऱ्यांना लागवडीस देण्याचा त्यांचा मानस आहे. सुमारे दहा गुंठे क्षेत्रावर यांनी ही लागवड केली आहे. सुमारे दोन ते अडीच क्विंटल उत्पन्न त्यांना अपेक्षित आहे. आपल्या जागृत वृत्तीने व अभ्यासुपणाने रमाकांत डेरे यांनी काळभात नामशेष होताना वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. डेरे यांनी शेतकऱ्यांना आपले पारंपरीक वाण संवर्धन करण्याचे आवाहन केले आहे. (Black rice has many health benefits)

काळभाताचे फायदे

काळभात हे देशी वाण आहे. खायला एकदम चविष्ट असते. हा भात शिजवला तरी परिसरात सुगंध दरवळतो. आदिवासी भागात याचे फार महत्त्व आहे. मधुमेही रूग्णांसाठी हा भात एकदम आरोग्यदायी मानला जातो. पोटदुखीसारखे आजारही या काळ्या साळीमुळे दूर पळतात, अशी आदिवासींमध्ये वदंता आहे. साधारणपणे हा भात १०० रूपये किलोप्रमाणे विकला जातो. आणि हातसडीच्या तांदळाची किंमत १२५ रूपये आहे.

Edited By - Ashok Nimbalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com