आईच्या रुद्रावतारापुढे बिबट्याची माघार !

मुलावर जेव्हा संकट येतं तेव्हा आई कसं दुर्गेचे रूप धारण करते, याचा प्रत्यय आणून देणारी घटना चंद्रपुरात घडली आहे. चक्क बिबट्याच्या मुखातून आपल्या पाच वर्षांच्या चिमुकलीला या मातेने सुखरूप बाहेर काढले.
आईच्या रुद्रावतारापुढे बिबट्याची माघार !
आईच्या रुद्रावतारापुढे बिबट्याची माघार !SaamTv

चंद्रपूर : पोटच्या गोळ्यावर जेव्हा संकट येते, तेव्हा आई कशाप्रकारे दुर्गामातेचे रूप धारण करते, याचाच प्रत्यय आणून देणारी घटना काल चंद्रपुरात घडली आहे. बिबट्याच्या रूपात आलेल्या काळाच्या मुखातून आपल्या पाच वर्षांच्या चिमुकलीला या मातेने सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळवले आहे. आपल्या लेकराला वाचवण्यासाठी आईने दाखवलेल्या या धाडसाचे आता सर्वत्र कौतुक होत आहे.

चंद्रपूर शहरालगत असलेल्या जुनोना गावात हि घटना घडली आहे. या गावाचा संपूर्ण परिसर घनदाट जंगलाने जंगलाने वेढलेला आहे. याच गावात अर्चना मेश्राम यांचे कुटुंब राहते. आई अर्चना मेश्राम आपल्या मुलीसह गावाशेजारी असलेल्या नाल्याजवळ रानभाज्या तोडण्यासाठी गेली होती. आई अर्चना मुलीला डोळ्यासमोर ठेवून भाज्या तोडत होती. मात्र आधीपासूनच तिथे दबा धरून बसलेला बिबट्या अर्चना यांच्या नजरेस आला नाही. अचानकपणे या बिबट्याने त्यांच्या ५ वर्षाच्या प्राजक्तावर झडप घातली आणि तिचे शीर जबड्यात धरले.

हे देखील पहा -

अचानकपणे झालेल्या या हल्ल्याने अर्चना काहीश्या घाबरल्या मात्र जराही विलंब न करता निर्भयपणे मुलीच्या सुटकेसाठी त्यांनी धाव घेतली. जवळच पडलेली लाकडाची काठी हात घेऊन सर्व शक्तीनिशी त्यांनी बिबट्यावर जोरदार प्रहार सुरु केले. मात्र, चवताळलेल्या बिबट्याने त्यांच्यावरही हल्ला चढवला. हातात असलेल्या काठीच्या साहाय्याने त्यांनी हा हल्ला परतावून लावला. काठीच्या हल्ल्यामुळे व मातेच्या या रुद्रावतारापुढे बिबट्याला शेवटी माघार घ्यावी लागली. पण अचानक या बिबट्याने पुन्हा दुसऱ्यांदा चिमुकलीला पकडले आणि त्या चिमुकल्या प्राजक्ताला फरफटत नेऊ लागला. बराच वेळ हा थरार सुरु होता. पोटच्या मुलीला वाचवण्यासाठी आईचा शर्थीचे प्रयत्न सुरु होता.

आईच्या रुद्रावतारापुढे बिबट्याची माघार !
चारित्र्यावर संशय घेत पत्नीचा गळा आवळून खून; आरोपी पतिचे आत्मसमर्पण

आता मात्र आई अर्चनाची 'दुर्गा' झाली होती. तिने पुन्हा बिबट्यावर जबरदस्त प्रहार केला यावेळी बिबट्याने पोबारा केला. या हल्ल्यानंतर जखमी अवस्थेतील बेशुद्ध प्राजक्ताला घेऊन अर्चना यांनी तातडीने चंद्रपुरातील रुग्णालय गाठले. चंद्रपुरातील उपचार झाल्यांनतर सध्या प्राजक्तावर नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालयात चेहऱ्याच्या पक्षाघातावर उपचार करण्यात येत आहेत. पोटच्या गोळ्याला वाचवण्यासाठी या मातेने प्राणाची बाजी लावली आणि मृत्यूच्या रुपात आलेल्या बिबट्याला आईमध्ये दडलेल्या दुर्गेचे रूप दाखवले. जखमी प्राजक्तावर उपचार सुरु असून तिला बरे करण्यासाठी डॉक्टर आता प्रयत्न करीत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com