बीड जिल्हा पुन्हा हादरला! दुसरी मुलगी नको म्हणून विवाहितेसोबत भयंकर कृत्य

परळीत पती, सासू, डॉक्टरसह चौघांवर गुन्हा दाखल
Beed Crime News
Beed Crime NewsSaam Tv

बीड - गेल्या काही दिवसांपूर्वीच बीडच्या (Beed) बकरवाडी गावामध्ये अवैध गर्भपात करताना, 30 वर्षीय विवाहितेचा अतिरक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यानंतर जिल्ह्यातील अवैध गर्भपाताचे रॅकेट उघडकीस आलं होतं. आता पुन्हा एकदा बीडच्या (Beed) परळीमध्ये (Parali) अवैध गर्भपाताचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मागील वर्षी मुलीला जन्म दिलेली विवाहिता पुन्हा गर्भवती राहिली. परंतु, दुसऱ्या वेळेस मुलगी नको, मुलगाच हवा या हट्टापायी कुटुंबीयांनी, एका डॉक्टरला हाताशी धरून बेकायदेशीरपणे गर्भलिंगनिदान केले. गर्भात मुलगीच आहे हे लक्षात आल्यानंतर, पती आणि सासूच्या सांगण्यावरून त्या डॉक्टरने गर्भ अक्षरशः कापून बाहेर काढला. मुलगी असो किंवा मुलगा, मला गर्भपात नको, माझ्या बाळाला मारू नका. असा आक्रोश करणाऱ्या मातेकडेही त्या डॉक्टरने दुर्लक्ष केले.

हे देखील पाहा -

अखेर त्या मातेच्या फिर्यादीवरून पती, सासू, डॉक्टर आणि अन्य एका व्यक्तीवर परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळं पुन्हा एकदा गर्भपाताच्या घटनेने बीडसह परळी हादरली असून मानवतेला काळीमा फासणाऱ्या या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

सरस्वती नारायण वाघमोडे वय 22, रा. शिवाजीनगर, परळी असे त्या पिडीत विवाहितेचे नाव आहे. सरस्वतीच्या फिर्यादीनुसार, 2020 साली तिचे लग्न नारायण अंकुश वाघमोडे याच्यासोबत झाले. नारायण परळीच्या औष्णिक विद्युत केंद्रात नोकरीवर आहे. लग्न झाल्यापासूनच पती नारायण आणि सासू छाया तिचा मारहाण, शिवीगाळ करून छळ करत. तिला माहेरी देखील बोलू देत नसत. दरम्यान, मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात सरस्वतीने एका मुलीला जन्म दिला. त्यानंतर यावर्षी सरस्वती पुन्हा गर्भवती राहिली.

दुसऱ्यांदा गर्भवती असलेल्या सरस्वतीकडून मुलगाच हवा असा हट्ट पती आणि सासूने धरला. सोनोग्राफी करून गर्भलिंगनिदान करू आणि मुलगी असली तर गर्भपात करायचा असे ते म्हणू लागले. मात्र, मुलगा असो की मुलगी मला गर्भपात करायचा नाही असे सरस्वतीने स्पष्ट सांगितले. तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून पती आणि सासूने जून महिन्यात गर्भलिंग निदानासाठी डॉ. स्वामी सोबत संपर्क साधला. डॉ. स्वामीने सोनोग्राफी मशीन घेऊन घरी येत, सरस्वतीचे गर्भलिंगनिदान केले आणि मुलगी असल्याचे सांगितले. सरस्वतीने मुलगी असली तरी पाहिजे, गर्भपात नको असे म्हणताच पतीने तिला पुन्हा मारहाण केली.

Beed Crime News
सोनिया गांधींच्या ED चौकशीविरोधात राहुल गांधींचे धरणे; पोलिसांनी जबरदस्ती ताब्यात घेतल्याचा आरोप

जुलै महिन्यात सरस्वती आजारी पडली. तिला ताप, उलट्याचा त्रास होऊ लागला. 15 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता सासूचा मेहुणा प्रकाश कावळे हा पुन्हा डॉ. स्वामीला घेऊन घरी आला. यावेळी सुद्धा पती, सासू, डॉक्टर आणि प्रकाश यांच्यात गर्भपात करण्यासंदर्भात कुजबुज सुरु होती. त्यानंतर डॉ. स्वामीने पुन्हा सोनोग्राफी केली.

तापेसाठी इंजेक्शन देत आहे असे सरस्वतीला सांगत त्याने तिला गर्भपाताचे इंजेक्शन टोचले आणि प्रकाशसोबत तिथून निघून गेला. त्यानंतर एक-दिड तासाने तिला पोटदुखीचा त्रास सुरु झाला आणि विश्वासघाताने गर्भपाताचे इंजेक्शन टोचण्यात आल्याचे तिने ओळखले. सरस्वतीने ताबडतोड पुणे येथे राहणाऱ्या भावाला मेसेज करून सर्व माहिती दिली. माझा जबरदस्तीने गर्भपात करणार आहेत, तू लवकर ये असेही तिने भावाला सांगितले.

तर दुसरीकडे इंजेक्शनमुळं सरस्वतीला होणारा तर काही कमी होत नव्हता. त्यामुळे 16 जुलै रोजी पहाटे 1:30 वा. डॉ. स्वामी पुन्हा तिच्या घरी आला त्याने सरस्वतीची तपासणी केली. पिशवीला छिद्र करून गर्भ काढावा लागेल असे त्याने सांगितले. यावेळी देखील माझा गर्भपात करू नका अशी विनवणी सरस्वती वारंवार करत होती.

मात्र, सर्वांनीच तिच्या आक्रोशाकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर सासूने तिचे हात पकडले आणि डॉ. स्वामीने अक्षरशः गर्भ कापून तुकडे करून बाहेर काढला. त्यानंतर पती, सासू आणि प्रकाश कावळे याने ते विल्हेवाट लावण्यासाठी तो गर्भ घेऊन निघून गेले. तर झालेल्या प्रकाराबद्दल कुठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी त्यांनी सरस्वतीला दिली.

त्यानंतर 16 जुलै रोजी सकाळी सरस्वतीचा भाऊ आला. पती, सासू यांना विनंती करून रात्री तो सरस्वतीला घेऊन पुण्याला गेला. मात्र गर्भपात झालेला असल्यामुळे तिथेही तिला खूप शारीरिक त्रास झाला. अखेर तिने पोलीस ठाणे गाठून झालेल्या प्रकाराविरोधात फिर्याद दिली. तिच्या फिर्यादीवरून पती नारायण वाघमोडे, सासू छाया वाघमोडे, डॉ. स्वामी आणि प्रकाश कावळे या चौघांवर परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com