सत्‍तापालटची भाजपला भिती; सर्व सदस्‍यांना केले ‘नॉट रिचेबल’

सत्‍तापालटची भाजपला भिती; सर्व सदस्‍यांना केले ‘नॉट रिचेबल’
भाजप
भाजप

धुळे : सांगली, जळगाव व नगर महापालिकेतील करेक्‍ट कार्यक्रमामुळे सत्‍तापालटची भाजपला भिती वाटू लागली आहे. धुळे महापालिकेत निर्विवाद सत्ता असलेल्या भाजपला आपल्या सत्ताकाळातील दुसऱ्या अडीच वर्षांसाठी महापौर निवडताना कोणतीही कसरत करावी लागणार नाही, असा अंदाज होता. मात्र, महाविकास आघाडीच्‍या भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’ लावत सत्तापालट केल्याने धुळे महापालिकेतील भाजपला कसरत करण्याची वेळ आली आहे. फोडाफोडीच्या धाकधुकीमुळे भाजपने आपल्या नगरसेवकांना सुरक्षित (पर्यटन) स्थळी हलविल्याची खात्रीलायक माहिती आहे. त्यामुळे सहज होणारी महापौरपदाची निवडणूक रंगतदार बनली आहे. (dhule-corporation-news-BJP-fears-change-of-government-all-members-tour)

डिसेंबर २०१८ मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत विरोधकांचा पुरता धुव्वा उडवत भाजपने ७४ पैकी तब्बल ५० नगरसेवक निवडून आणत महापालिकेत निर्विवाद सत्ता स्थापन केली. मात्र, त्यामुळे पदांसाठी दावेदार वाढले. पहिल्या अडीच वर्षांसाठी ज्येष्ठ, अनुभवी चंद्रकांत सोनार यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडली. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर पुन्हा एकदा महापौर पदासाठी पक्षांतर्गत चुरस पाहायला मिळत आहे. यात प्रामुख्याने वालीबेन मंडोरे, प्रतिभा चौधरी, प्रदीप कर्पे, संजय पाटील आदी नावे चर्चेत आहेत. माजी स्थायी समिती सभापती युवराज पाटील यांनीही या यादीत एन्ट्री केली आहे. दरम्यान, चर्चेत नसलेले काही जणही प्रबळ दावेदार असल्याचे मानले जाते. त्यामुळे पक्षाकडून कुणीला संधी मिळते, याची उत्सुकता आहे.

नगरसेवकांना दमणची ट्रीप?

धुळे महापालिकेत भाजपकडे मजबूत संख्याबळ असले तरी राज्यात सांगली, जळगाव, नगर महापालिकांमध्ये महाविकास आघाडीने भाजपकडून सत्ता हिसकावून घेतल्याने धुळ्यातील भाजपलाही धाकधूक आहे. या धाकधुकीमुळेच शनिवारी (ता.११) रात्री भाजपच्या सर्व नगरसेवकांना सुरक्षितस्थळी हालविले आहे. हे नगरसेवक दमणला पाठविल्याची खात्रीलायक माहिती आहे. महापौर पदासाठी १७ सप्टेंबरला निवडणूक होत आहे. त्यामुळे पुढचे तीन-चार दिवस या नगरसेवकांचा तेथेच मुक्काम असेल अशी शक्यता आहे.

भाजप
Breaking..जळगाव पुन्हा हादरले; सलग दुसऱ्या दिवशी खून

विरोधकांची नुसती हवा

राज्यात काही ठिकाणी सत्ता गमवावी लागल्याने ‘ताकही फुंकून प्यावे’ या उक्तीप्रमाणे भाजपकडून हालचाली सुरू आहेत. दुसरीकडे महापालिकेतील विरोधी पक्ष मात्र नेहमीप्रमाणे निष्क्रिय असल्याचे चित्र आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, ‘एमआयएम’कडून एखाद-दोन जणांनी सत्तापालट होईल, अशी वल्गना केली खरी; पण त्यादृष्टीने काही हालचाली दिसलेल्या नाहीत. विरोधी पक्षांकडून महापौरपदासाठी अर्जही घेतले गेले आहेत; पण ती फक्त ‘हवा’ असल्याचे चित्र आहे.

आज अंतिम मुदत

महापौर पदासाठी भाजपकडून रविवारी (ता.१२) नगरसेवक संजय पाटील, प्रदीप कर्पे व प्रतिभा चौधरी यांनी अर्ज घेतले. तत्पूर्वी ११ सप्टेंबरला मोमीन इस्माईल (अपक्ष) मदिना पिंजारी (काँग्रेस) व श्रीमती अन्सारी गनी (एमआयएम) यांनी अर्ज घेतले आहेत. दरम्यान, आज (ता.१३) अर्ज घेण्याची व सादर करण्याची अंतिम मुदत आहे. सकाळी अकरा ते एक यादरम्यान अर्ज प्राप्त करता येतील, तर सकाळी अकरा ते दुपारी दोनपर्यंत अर्ज दाखल करता येतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com