धुळे महापौर निवडणूक.. ‘करेक्‍ट कार्यक्रम’चे नो टेंशन; विरोधक विखुरलेले

धुळे महापौर निवडणूक.. ‘करेक्‍ट कार्यक्रम’चे नो टेंशन; विरोधक विखुरलेले
धुळे महापौर निवडणूक.. ‘करेक्‍ट कार्यक्रम’चे नो टेंशन; विरोधक विखुरलेले
Dhule Corporation

धुळे : अडीच वर्षांच्या दुसऱ्या टप्प्यातील महापौर निवडणुकीच्या प्रक्रियेत अर्ज सादर करण्याच्या सोमवारी (ता.१३) शेवटच्या दिवशी पाच अर्ज दाखल झाले. महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडून नगरसेवक प्रदीप कर्पे यांचा एकमेव अर्ज असल्याने राजकीय उलथापालथ झाली नाही, तर त्यांच्याच गळ्यात महापौरपदाची माळ पडल्यात जमा आहे. दुसरीकडे संख्याबळ नसताना विरोधकांकडून तब्बल चार नगरसेवकांनी अर्ज दाखल केल्याने विरोधकांमध्ये एकजूट नसल्याचेच सध्यातरी अधोरेखित झाले. (dhule-news-Dhule-mayor-election-bjp-correct-program-Opponents-scattered)

महापौरपदासाठी १७ सप्टेंबरला निवडणूक होईल. भाजपचे प्रभाग ११ मधील नगरसेवक प्रदीप कर्पे यांना पक्षाने संधी दिली. त्यामुळे ते अर्ज दाखल करण्यासाठी महापालिकेत आले. त्यांच्या समवेत माजी महापौर चंद्रकांत सोनार, योगिता बागूल व काही कार्यकर्ते उपस्थित होते. श्री. कर्पे यांनी दोन अर्ज दाखल केले. त्यांच्या अर्जावर माजी महापौर श्री. सोनार व भाजपच्या नगरसेविका वैशाली वराडे सूचक, तर नगरसेविका योगिता बागूल व किरण कुलेवार अनुमोदक आहेत.

विरोधक विखुरलेलेच

महापालिकेत ७३ पैकी तब्बल ५० नगरसेवक भाजपचे आहेत. त्यामुळे विरोधकांचे संख्याबळ तुलनेने नगण्य आहे. असे असताना विरोधी पक्षांकडून चार नगरसेवकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यात काँग्रेसकडून पिंजारी मदिना समशेर, अपक्ष नगरसेवक मोमीन आसिफ इस्माईल, शिवसेनेकडून ज्योत्स्ना पाटील, एमआयएमतर्फे अन्सारी सईदा मो. इक्बाल यांनी अर्ज सादर केला. संबंधित उमेदवारांसाठी आमदार फारुक शाह, युवराज करनकाळ, हिलाल माळी, रणजित भोसले, मनोज मोरे, साबीर शेख, कमलेश देवरे, सुभाष जगताप, गजानन अंपळकर आदी उपस्थित होते.

शेवटी ते आलेच नाहीत

भाजपकडून ज्येष्ठ नगरसेविका प्रतिभा चौधरी व नगरसेवक संजय पाटील महापौर पदासाठी इच्छुक होते. श्री. कर्पे यांना संधी दिल्यानंतरही श्री. पाटील अर्ज दाखल करण्याची चर्चा होती. त्यामुळे भाजपमध्ये धाकधूक तर विरोधकांमध्येही उत्सुकता होती. दुपारी दोनपर्यंत सस्पेन्स होता. मात्र, श्री. पाटील महापालिकेत फिरकले नाहीत.

Dhule Corporation
मुलाच्‍या मृत्‍यूचे दुःख..पार्थिव नेण्यासाठी पित्याला मागावी लागली भिक्षा

सत्ताधारी भाजपकडून व्हीप जारी

महापौर निवडणुकीसाठी भाजपने स्व-नगरसेवकांना व्हीप काढला आहे. महापौरपदासाठी पक्षाने कर्पे यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. त्यामुळे श्री. कर्पे यांनाच मतदान करावे. पक्षादेशाचे पालन न केल्यास तरतुदीनुसार कार्यवाही होईल, असे व्हीपमध्ये म्हटले आहे. भाजपच्या गटनेत्या वालीबेन मंडोरे यांच्या स्वाक्षरीने व्हीप बजावला आहे.

दमणला वाद अन्‌ रक्तदाब कमी..

महापौर पदाच्या निवडीत उलथापालथ करू, अशी चर्चा भाजपच्या विरोधकांकडून पेरली गेली. त्यामुळे सावध पवित्रा घेत भाजपने आपले सर्व नगरसेवक पर्यटनासाठी दमणला पाठविले. तसेच काही विरोधकांची मदत घेत त्यांना शांत बसण्यास सांगितले. दमण येथून श्री. कर्पे यांना सोमवारी एकट्याला धुळ्यात बोलविले. त्यामुळे इतर नगरसेवकांना कर्पे महापौर होत असल्याची कुणकूण लागली. तेव्हा भाजपचे दोन नगरसेवक व सर्वांवर देखरेख ठेवणाऱ्या त्रयस्थ व्यक्तींमध्ये वाद झाले. तसेच इच्छुक महिला उमेदवाराचा भ्रमनिरास झाल्याने त्यांचा रक्तदाब कमी झाला. या घडामोडींची शहरात खुमासदार चर्चा होती.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com