
Cm Eknath Shinde On Temple Digital Mapping: राज्यातील ज्या मंदिर, देवस्थानांमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते त्यांचे डिजिटल मॅपिंग करण्यात यावे. जेणेकरून भाविकांना अधिकाधिक चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणे शक्य होईल. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरातील सर्व रस्त्यांची दुरूस्ती करण्यात यावी. रस्त्यावर एकही खड्डा दिसता कामा नये. रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी नगरविकास विभागाने तातडीने १० कोटी रुपयांचा निधी पंढरपूर नगरपरिषदेस वितरित करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अधिकाऱ्यांना दिले आहेत.
आज मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य शिखर समितीच्या बैठकीत ७३ कोटी ८० लाख रुपयांच्या पंढरपूर मंदिर विकास आराखडा आणि ३६८ कोटी रुपयांच्या अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले, वारकरी केंद्रबिंदू ठेवून पंढरपूर मंदिर विकास आराखड्याची अंमलबजावणी करा. मंदिराचे प्राचीन वैभव कायम ठेवत भाविकांची सुरक्षा आणि सोयीसुविधा यांची सांगड घालण्याचे काम करा. यात्रेसाठी लाखो भाविक पंढरपूरात येत असतात अशावेळी घाट सुशोभीकरण, रस्ते दुरूस्ती तसेच विविध सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. त्यासाठी यात्रा अनुदान ५ कोटीवरून १० कोटी रुपये करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. (Latest Marathi News)
आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजवतानाच त्यांची दुरुस्ती तातडीने करण्यात यावी. नगरविकास विभागाने रस्त्यांच्या डागडुजीसाठी पंढरपूर नगरपरिषदेला तातडीने १० कोटी रुपयांचा निधी वितरित करावा. पंढरपूर शहरातील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात यावे, अशा सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
पंढरपूर मंदिर विकास आराखड्यात ७३ कोटी ८० लाख रुपयांची विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. त्याचे सादरीकरण पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केले. या आराखड्यानुसार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन आणि संवर्धन, पायाभूत सुविधा, गर्दी व्यवस्थापन, पर्यटक सुविधा नियोजन करण्यात येणार आहे. जतन आणि संवर्धन कामांमध्ये अनियोजित अनावश्यक जोडण्या काढणे, पाणी गळती रोखणे, दगडी बांधकाम आवश्यकतेनुसार दुरूस्त करणे, मंदिर परिसरातील दीपमाळांची पुनर्बांधणी करणे आदी कामे हाती घेण्यात येणार आहेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.