वनाधिकारी असल्याचे सांगत फसवणूक करणाऱ्याला आठ महिन्यांनी अटक

जितेंद्र सुधाकरसिंह नामक व्यक्तीने बल्लारपुरात येऊन आपण मध्यप्रदेशात उमिया अभयारण्यात वनाधिकारी असल्याचे सांगितले.
वनाधिकारी असल्याचे सांगत फसवणूक करणाऱ्याला आठ महिन्यांनी अटक
वनाधिकारी असल्याचे सांगत फसवणूक करणाऱ्याला आठ महिन्यांनी अटकSaam Tv

चंद्रपूर: वनाधिकारी असल्याचे सांगून लाकूड व्यापाऱ्याला फसवणा-या भामट्याला अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून तब्बल आठ महिन्यांनी ही अटक करण्यात आली आहे. 2020 च्या ऑक्टोबर महिन्यात चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात लाकूड व्यापारी लक्ष्मण पटेल यांनी यासंदर्भात तक्रार दिली होती.

जितेंद्र सुधाकरसिंह नामक व्यक्तीने बल्लारपुरात येऊन आपण मध्यप्रदेशात उमिया अभयारण्यात वनाधिकारी असल्याचे सांगितले. सागवान लाकूड विक्री आपला स्वतंत्र व्यवसाय असल्याची खोटी बतावणी पण त्याने केली. यावर पटेल यांनी विश्वास ठेवला. यादरम्यान पटेल आणि आरोपी यांच्यात मध्यप्रदेशातून सागवान भरलेला एक ट्रक माल आणण्याचा सौदा झाला. त्यासाठी साडेपंधरा लाख रुपये आगाऊ घेतले गेले.

मात्र पटेल यांचे सागवान पोचलेच नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर पटेल यांनी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी आरोपीचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपी आपले वास्तव्याचे ठिकाण सतत बदलत असल्याने पोलिसांना तपासात मर्यादा आल्या होत्या. अखेर वाराणसीत योग्य सापळा लावत आरोपी जितेंद्र सुधाकरसिंह (वय ३६) याला जेरबंद करण्यात आले. आरोपी बल्लारपूर पोलिसांच्या कोठडीत असून, गुन्ह्यांची माहिती घेतली जात आहे.

Edited By: Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com