
अकोला: अकोला (Akola) जिल्ह्यातील पातुर तालुक्यातल्या 'मोर्णा डॅम' आणि 'पातुर जंगल' परिसर तरुणाई आणि प्रेम युगुलांना (Couple) धोकादायक ठरत आहे. कारण इथे फिरण्यासाठी आलेल्या प्रेमी युगुलांसोबत असं काही घडतं की ऐकून धक्का बसेल. प्रेमी युगुलांचे व्हिडिओ काढून त्यांना लुटण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र बदनामीच्या भितीपोटी ही जोडपी तक्रारीसाठी पुढे येत नाही, आणि म्हणूनच हे टवाळखोर मुलं त्यांचे चित्रीकरण करुन त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल करण्याची धमकी देतात. (Akola Crime News)
हे देखील पाहा -
अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातल्या 'मोर्णा डॅम' आणि पातुर जंगल पावसामुळे खुलला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे येथील नदी-नाले, छोटे धबधबे प्रवाहित झाले आहेत. डोंगरांनी हिरवा शालू पांघरला आहे. पण आता हा परिसर प्रेमी जोडप्यांसाठी धोकादायक ठरत आहे, इथं फिरण्यासाठी येणाऱ्या प्रेमी जोडप्यांना त्रास दिला जात आहे.
फिरायला आलेली प्रेमी जोडपी या निसर्गरम्य वातावरणात एका झाडाखाली बसलेले असतात. त्यांच्यात ते रमलेले असतात, मात्र तेवढ्यात काही टवाळखोर मुले त्यांच्याजवळ येतात, अन तुम्ही कुठले, कुठून आलेत, इथं काय करताय, तुमच्या घरच्यांना लागलीच इथं बोलवा, असा दम लावतात. याच दरम्यान या टवाळखोर मुलांपैकी एक मुलगा त्यांचं चित्रकरण म्हणजेच व्हिडिओ काढत असतो. हा संपूर्ण प्रकार कॅमेरात कैद होतो. कॅमेरा बंद केल्यानंतर या प्रेमी जोडप्यांकडून हे टवाळखोर मुले पैसे घेत असल्याचे समोर आले. तर कित्येकांचे चित्रीकरण करुन त्यांचे व्हिडिओ देखील व्हायरल केले आहे.
शनिवारी, पातुर तालुक्यातील शिक्षक असलेला व्यक्ती एका तरुणीसोबत याच परिसरात फिरायला आला, यावेळी त्याच्यासोबत देखील हाच प्रसंग घडलाय. आता या शिक्षकासह त्या तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होतोय. यासंदर्भात त्यांनी बोलायलाही नकार दिला आहे.
अनेक प्रेमी जोडप्यांचे व्हिडिओ अशा प्रकारे काढले जात आहे, मात्र बदनामीपोटी तक्रारीसाठी कुणीही पुढे जात नाही. पातुरचा हा परिसर सध्या दुर्लक्षित पर्यटनस्थळ असल्याने इथं तरुण-तरुणींचा कल जास्त असतो. त्यामुळे आता वनविभाग आणि स्थानिक पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. दरम्यान "अद्यापपर्यंत आमच्याकडे कोणतीही तक्रार दाखल झाली नाही, जर कोणी तक्रारीसाठी पुढे आले तर संबंधितांवर तातडीने कारवाई केली जाईल आणि योग्य ते पाऊल उचलले जाईल" असे पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी सांगितले.
Edited By - Akshay Baisane
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.