दुचाकी चोरांची टोळी जेरबंद; दहा दुचाकी जप्त- नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई

नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत सहा महिन्यापासून 31 दुचाकी चोरीच्या घटनांची नोंद करण्यात आली आहे. या अगोदरही न‌ऊ दुचाकी जप्त करण्यात आल्या होत्या.
दुचाकी चोरांची टोळी जेरबंद; दहा दुचाकी जप्त- नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई
दुचाकी चोरांची टोळी जेरबंद

नांदेड : शहर व जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून सतत दुचाकी चोरीच्या घटना वाढत असल्याने पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या सूचनांवरुन स्थानिक पोलिसांनी आता कंबर कसली आहे. दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी शहरात वेगवेगळी पथके तैनात करण्यात आली असून पोलिस ठाणेस्तरावर गुन्हे शोध पथक सक्रिय झाले आहे. नांदेड ग्रामीण पोलिसांनी अशीच एक कारवाई करुन पाच दुचाकी चोरांना अटक केली असून त्यांच्याकडून दहा दुचाकी जप्त केल्या आहेत.

पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत सहा महिन्यापासून 31 दुचाकी चोरीच्या घटनांची नोंद करण्यात आली आहे. या अगोदरही न‌ऊ दुचाकी जप्त करण्यात आल्या होत्या. दाखल गुन्ह्यातील तपास जलद गतीने व्हावा यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी (इतवारा) डॉ. सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी आपल्या गुन्हे शोध पथकाला अलर्ट केले. दाखल दुचाकी चोरीच्या घटना उघडकीस आणून आरोपींच्या मुसक्या आवळण्याच्या सूचना केल्या.

हेही वाचा- बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना होणारा त्रास बघता ग्राम पंचायत निवघा बा. यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग हदगांव यांना रस्ता व नाल्या दुरुस्ती करण्यासाठी दोनवेळा लेखी पत्र देवून रस्ता दुरुस्तीची मागणीसुद्धा करण्यात आली.

यावरुन पथकाने पी. सुधीर चव्हाण (वय १९) राहणार गुरुद्वारा गेट नंबर एक, वजीराबाद, राजेंद्रसिंह बजरंगसिंह कच्छवा (वय १९) चिरागगल्ली इतवारा नांदेड यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी अनिल फकीरा पवार (वय २४) राहणार गायत्री मंदिराजवळ वजीराबाद आणि तुषार भगवान दुधमल (वय २२) राहणार ब्राह्मणवाडा तालुका मुदखेड तसेच मधुकर रावसाहेब राजेमोह (वय २३) राहणार ब्राह्मणवाडा तालुका मुदखेड हे दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात सहभागी असल्याचे सांगितले.

पोलिसांनी या पाचही जणांना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक करुन त्यांच्याकडून एका बुलेटसह दहा चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. यांच्यावर नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये पाच स्प्लेंडर प्लस, एक बजाज पल्सर, एक होंडा शाईन व शहरातील इतर ठिकाणाहून चोरलेल्या दुचाकी गाड्यांचा समावेश आहे. अशा एकूण दहा दुचाकी जप्त केल्या आहेत.

येथे क्लिक करा - माझी पोषण परसबाग विकसन मोहीम’ उपक्रमामध्ये बुलढाणा जिल्हा अग्रेसर

प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड यांच्याकडून सात गाड्यांची माहिती देण्यात आली असून संबंधित गाड्यांच्या मूळ मालकास वाहन पोलिस ठाणे येथे असल्याबाबत कळविण्यात आले आहे. आजपर्यंत 19 दुचाकी जप्त करण्यात आल्या असून गुन्ह्यातील आरोपी हे पोलिस कोठडीमध्ये असून त्यांच्याकडून अजून काही दुचाकी चोरीची घटना उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

या कारवाईमध्ये पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे फौजदार असद शेख, पोलिस अमलदार श्री कराळे, श्री जाधव, श्री मलदोडे, श्री नागरगोजे, श्री कवठेकर, श्री पवार, श्री कोरनुळे, श्री पाटील, श्री स्वामी आणि दत्ता पवार यांनी परिश्रम घेतले.

उल्लेखनिय कामगिरीबाबत पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, विजय कबाडे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी सिद्धेश्वर भोरे यांनी पथकाचे कौतुक केले आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com