राहुरीच्या कैद्यांना मिळणार डोस, तहसीलदारांनी घेतला पुढाकार

राहुरीच्या कैद्यांना मिळणार डोस, तहसीलदारांनी घेतला पुढाकार
Corona Vaccine

विलास कुलकर्णी

राहुरी : राहुरीच्या कारागृहातील न्यायालयीन व पोलीस कोठडीतील कैद्यांचे कोरोना लसीकरण करण्यासाठी तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्याशी चर्चा करून, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दीपाली गायकवाड यांना लसीचे डोस उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. त्यामुळे, राहुरीचे कारागृह लसीकरणात अग्रेसर ठरणार आहे.

प्रत्येक वर्षी सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद होणारा राहुरी तालुका जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. खून, दरोडे, चोऱ्या, भावकीचा वाद, हुंडाबळी, शेतकऱ्यांची बांधावरून भांडणे, पती-पत्नी वाद यासारख्या प्रकारातून न्यायालयीन व पोलीस कोठडीतील कैद्यांची संख्या मोठी आहे. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात व घटनास्थळी घेऊन जाणे व कारागृहात परत आणणे. याकामी पोलीस व नागरिकांशी आरोपींचा संपर्क होतो. त्यातून कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका असतो. (Inmates of Rahuri Jail will get corona vaccine)

राहुरीच्या कारागृहात बंदिस्त असलेले अनेक स्त्री-पुरुष शेतकरी, व्यापारी व सामान्य कुटुंबातील असून परिस्थितीमुळे गुन्हेगार झालेले आहेत. प्रांताधिकारी डॉ. दयानंद जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण शिबिरामुळे कैद्यांना कोरोना विषाणूच्या संसर्गात सुरक्षा लाभणार आहे. Inmates of Rahuri Jail will get corona vaccine

राहुरी कारागृहातील कैद्यांची संख्या :

न्यायालयीन कोठडी : ३५ पुरुष, ६ महिला.

पोलीस कोठडी : ६ पुरुष, १ महिला.

एकूण कैदी : ४८.

कैद्यांच्या जीवाला धोका होऊ नये. यासाठी माणुसकीच्या भावनेतून अनेकदा रॅपिड ॲन्टीजेन चाचण्या केल्या. कोरोना बाधित कैद्यांना उपचार देऊन, कोरोनामुक्त केले. कैद्यांना कोविड लसीकरणाचा तहसीलदारांचा निर्णय स्तुत्य आहे.

- नंदकुमार दुधाळ, पोलीस निरीक्षक, राहुरी.

राहुरीच्या कारागृहातील कैदी अनेकदा कोरोनाग्रस्त झाले. त्यांना नागरिकांसारखे लसीकरणाच्या ठिकाणी नंबर लावून, लस घेणे शक्य नाही. कोरोना लसीकरणात कैदी वंचित राहू नयेत. यासाठी, डोस उपलब्ध होताच शिबिर घेतले जाईल.

- फसियोद्दीन शेख, तहसीलदार, राहुरी.

Edited By - Ashok Nimbalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com