Maharashtra Political Crisis Live Updates: व्हीप विरोधात मतदान केल्याने शिवसेनेकडून ३९ आमदारांच्या निलंबनासाठी याचिका

विरोधी पक्षनेतेपदासाठी अजित पवार, जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा
Vidhan Bhavan
Vidhan BhavanSaam TV

व्हीप विरोधात मतदान केल्याने शिवसेनेकडून ३९ आमदारांच्या निलंबनासाठी याचिका

व्हीप विरोधात मतदान केल्याने ३९ बंडखोर आमदारांचे निलबंन करावे. याबाबतची याचिका शिवसेनेने अध्यक्षांकडे दाखल केली आहे.

विरोधी पक्षनेतेपदासाठी अजित पवार, जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा; कोणाची लागणार वर्णी?

आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीतर्फे, शरद पवार यांच्या उपस्थितीत एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत विरोधी पक्षनेतेपदासंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. शिवाय या बैठकीला पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित आहेत.

विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष सर्वांना समान न्याय देतील - CM एकनाथ शिंदे

विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सगळ्यांना समान न्याय देण्याचा निश्चितच प्रयत्न करतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. विधानसभेच्या विशेष आधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत सरकारच्या वतीने राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी बहुमताने निवड करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

विधानसभा अध्यक्षपदासाठी कुणी मतदान केलं नाही?

1. नवाब मलिक -- राष्ट्रवादी

2. अनिल देशमुख --राष्ट्रवादी

3. निलेश लंके -राष्ट्रवादी

4. दिलीप मोहिते -राष्ट्रवादी

5.दत्तात्रय भरणे -राष्ट्रवादी

6.अण्णा बनसोडे -राष्ट्रवादी

7.बबनदादा शिंदे -राष्ट्रवादी

8.नरहरी झीरवळ (अपवाद -मतदान करू शकत नाहीत)

9.मुक्ता टिळक - भाजप

10.लक्ष्मण जगताप - एमआयएम

11.मुफ्ती इस्माईल - MIM

12.प्रणिती शिंदे -काँग्रेस

13.जितेन अंतापूरकर - काँग्रेस

14. रमेश लटके (मृत्यू)

तटस्थ

15. अबू आझमी -सपा

16. रईस शेख - सपा

17. शाह फारुख अनवर - एमआयएम

शिंदे गटातील एकही आमदाराने डोळ्यात डोळे घालण्याची हिंमत केली नाही - आदित्य ठाकरे

मुंबई- शिंदे गटातील एकही आमदारांपैकी एकाही आमदाराने डोळ्यात डोळे घालून बघण्याची हिंमत केली नाही, अशी प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्षांच्या निवडीनंतर आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

विधिमंडळात आता जावई-सासऱ्याची जोडी

विधानसभा अध्यक्षपदी निवड झालेले भाजपा नेते राहुल नार्वेकर हे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत. त्यावरुन विधानसभेत अनेक नेत्यांनी मिश्किल टिप्पणीही केली आहे.

"एकनाथ शिंदेंनी माझ्या कानात जरी सांगितलं असतं तर मीच उद्धव ठाकरेंशी बोलून मुख्यमंत्री केलं असतं "

फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री जाहीर करताच अनेक भाजपा नेते रडू लागले. गिरीश महाजन तर डोक्यावरचा फेटा डोळ्यावर बांधून अश्रू पुसत आहेत. एकनाथ शिंदेंनी माझ्या कानात जरी सांगितलं असतं तर मीच उद्धव ठाकरेंशी बोलून मुख्यमंत्री केलं असतं असंही अजित पवार म्हणाले.

राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी; बहुमताचा आकडा पार

विधानसभेच्या दोनदिवसीय विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात विश्वासदर्शक ठराव आणि विधानसभा अध्यक्षांची निवड झाली. अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल नार्वेकर, तर शिवसेनेचे राजन साळवी यांच्यात लढत झाली. या लढतीत भाजपचे राहुल नार्वेकर विजयी झाले. औपचारिक घोषणा बाकी आहे.

राहुल नार्वेकर यांना आतापर्यंत १४५ पेक्षा जास्त सदस्यांचे मतदान, बहुमताचा आकडा पार केला आहे. बहुजन विकास आघाडी, मनसे आणि बच्चु कडू यांच्या पक्षाचे राहुल नार्वेकर यांना मतदान केले आहे. भाजपा उमेदवार राहुल नार्वेकर यांना १६४ सदस्यांचे मतदान झालं आहे.

विधानसभा अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरु, मतदानाला सुरुवात

विधानसभेत निवडणुकीला सुरुवात झाली आहे. राहुल नार्वेकर आणि राजन साळवींच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला. आवाजी मतदानानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात करण्यात आली आहे.

जयंत पाटलांनी राज्यपालांचे या कारणासाठी केले अभिनंदन

आम्ही अनेकदा सांगितले अध्यक्ष निवडणूक घ्या. पण राज्यपाल यांनी काही मनावर घेतले नाही. त्यांनी आमची विनंती मान्य केली नाही. ते कशाची वाट पाहत होते ते आम्हाला आता कळाले. आधीच सांगितले असते तर एकनाथ शिंदे आधीच केले असते. आता राज्यपाल यांनी आम्ही पाठवलेल्या बारा नावांच्या यादीला मान्यता द्यावी मग आम्ही समजू राज्यपाल समान वागले, असंही जयंत पाटील म्हणाले.

एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांनी बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याला अभिवादन केलं

एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांनी कुलाबा येथील बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याला अभिवादन केलं आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदार येथे पोहोचले आहेत. भाजपा नेते प्रसाद लाडही यावेळी उपस्थित होते. बाळासाहेब आमचे दैवत आहेत अशी प्रतिक्रिया यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. विधानसभेत सभागृहात अध्यक्षपदी भाजपचा उमेदवार विजयी होईल, असा विश्वासही एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

शिवसेना पक्ष आमचाच, एकनाथ शिंदेंनी बजावला व्हीप!

शिवसेनेने काल सर्व आमदारांना विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी व्हीप जारी केला आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक थोड्याच वेळात पार पडणार आहे. आता एकनाथ शिंदे गटानेही सर्व आमदारांना व्हीप जारी केला आहे. हा व्हीप शिवसेनेच्या लेटरपॅडवर बजावला आहे, यात राहुल नार्वेकर यांना विजयी करा असा आदेश देण्यात आला आहे. काल शिवसेनेने व्हीप बजावला होता, या व्हीपमध्ये राजन साळवी यांना विजयी करण्याचे आदेश दिले आहेत.

विधानभवनातील शिवसेना विधी मंडल कार्यालय सील

विधानभवनातील शिवसेनेचं कार्यालय सील करण्यात आलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे गट विरुद्ध शिवसेना हा संघर्ष आता अधिक ताणला जाण्याची शक्यता आहे. शिवसेना विधिमंडळ पक्ष यांच्या सूचनेवरून कार्यालय बंद केल्याची नोटीस दरवाज्यावर लावण्यात आली आहे.

अजित पवार कोरोनामुक्त; आज कामकाजात सहभागी होणार

अजित पवार कोरोनामुक्त झाले असून त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. त्यामुळे आज अजित पवार विधानसभेच्या कामकाजात सहभागी होणार आहेत. २७ जून रोजी अजित पवारांना कोरोनाची लागण झाली होती

महाराष्ट्र विधानसभेत शिंदे-भाजप सरकारची पहिली कसोटी

राज्यात राजकीय भूकंप झाल्यानंतर आजपासून शिंदे-फडणवीस सरकारचं पहिलं अधिवेशन दोन दिवस होणार आहे. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची रणधुमाळी असणार आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आज होत आहे. भाजपाकडूनराहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेच्या राजन साळवी हे दोन उमेदवार अध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक देखील विधान परिषद आणि राज्यसभेप्रमाणे चुरशीची ठरणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com