
Malegaon Sabha News Update : राज्याचं राजकारण सध्या चांगलंच तापलं आहे. एकीकडे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर पक्षाने राज्यभरात सत्याग्रह आंदोलन सुरु केले आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची आज मालेगाव येथे सभा आयोजित करण्यात आली आहे. महाविकासआघाडीच्या या दोन्ही कार्यक्रमांवर सत्ताधाऱ्यांकडून टीका केली जात आहे.
मालेगावात उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वी उर्दूतील बॅनर झळकले. यानंतर भाजप आणि शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली जात आहे. या टीकेला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आंबादास दानवे यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो पोस्ट करत प्रत्युत्तर दिले आहे.
देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
देवेंद्र फडणवीस उर्दूतील बॅनरविषयी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना म्हणाले की, हा प्रश्न खरं तर त्यांना विचारायला हवा. उर्दू ही देखील एक भाषा आहे आणि आमचा त्याला विरोध नाही. आमचा विरोध हा लांगुनचालनाला आहे. याच उत्तर त्यांना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना द्यावं लागेल, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.
दानवेंनी पोस्ट केला फडणवीसांचा फोटो
त्यांच्या टीकेला उत्तर देताना शिवसेना नेते आंबादास दानवे यांनी फेसबूकवर फडणवीसांचा एक फोटो पोस्ट केला आहे. यात फडणवीस मुस्लीम बांधवांच्या कार्यक्रमात बोलताना दिसत आहे. या फोटोला आंबादास दानवे यांनी 'जिनके घर शीशे के बने होते हैं वो दूसरों पर पत्थर नहीं फेंकते...' असे कॅप्शन देत फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
शिवसेनेकडूनही उद्धव ठाकरेंवर टीका
दरम्यान शिवसेनेकडूनही उर्दूतील बॅनरनंतर उद्धव ठाकरेंवर टीका केली जात आहे. शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार सभेसाठी उर्दूमध्ये बॅनर बनवतात, तसेच सभेला येण्यासाठी फतवे काढावे लागत आहेत, अशी टीका केली आहे.
दानवेंनी पोस्ट केले मुख्यमंत्र्यांचे उर्दूतील पोस्टर
शिवसेनेकडून करण्यात आलेल्या टीकेलाही आंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. दानवे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचंच एक उर्दूतील पोस्टर फेसबूकवर पोस्ट केले आहे. जनाब एकनाथ शिंदे ये भी देख लो…. असे कॅप्शन देत त्यांनी आधीत हे पाहा आणि नंतर उध्दवसाहेबांवर टीका करा असे म्हटले आहे. तसेच तुमची तेवढी पात्रता नाही असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.
विनायक राऊतांचं विरोधकांना प्रत्युत्तर
दरम्यान ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी देखील भाजपला प्रत्युत्तर दिले आहे. भाजपवाले मौलविंना भेटतात, फडणवीसांच्या पत्नी अजमेर दर्ग्यात जातात, मग उर्दू भाषिकांनी उद्धव ठाकरेंचे स्वागत केले तर काय हरकत आहे असा सवाल विचारत विनायक राऊत भाजपवर निशाणा साधला. तसेच देवेंद्र फडणवीस आता बस झालं, जनता तुम्हाला उखडून फेकल्याशिवाय राहणार नाही असेही ते म्हणाले.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.