Raj Thackeray Latest Update: राज ठाकरे यांच्याविरोधात औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Raj Thackeray Booked
Raj Thackeray BookedSAAM TV

औरंगाबाद: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याविरोधात औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद येथील मनसेच्या सभेत प्रक्षोभक भाषण केल्याच्या संदर्भात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सभा घेण्यापूर्वी पोलिसांनी घातलेल्या १६ अटींपैकी १२ अटींचे उल्लंघन या सभेत झाल्याचे सूत्रांकडून समजते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची १ मे रोजी संध्याकाळी औरंगाबादमध्ये सभा झाली. या सभेला प्रचंड गर्दी झाली होती. या सभेपूर्वी पोलिसांनी १६ अटी घातल्या होत्या. त्यानंतरच राज यांच्या सभेला परवानगी दिली होती.

राज यांच्या औरंगाबाद येथील सभेनंतर त्यांच्यावर औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याचे पडसाद मुंबईत उमटू नयेत किंवा राज यांनी दिलेल्या अल्टीमेटममुळे मुंबईत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून राज ठाकरे यांनाही पोलीस १४९ अंतर्गत नोटीस बजावू शकतात, असे सांगण्यात येत आहे.

राज ठाकरे यांच्यासह सभेचे संयोजक राजू जवळेकर आणि मनसेचे इतर पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक गजानान इंगळे यांनी याबाबत तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी कलम ११६, ११७, १५३ सह कलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ सुधारित ३१ जुलै २०१७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Raj Thackeray Booked
राज ठाकरेंना तात्काळ अटक करा, अन्यथा संघर्ष अटळ; भीम आर्मीचा इशारा

'या' होत्या १६ अटी

जाहीर सभा ०१ मे रोजी १६.३० ते २१.४५ या वेळेतच आयोजित करण्यात यावी. कार्यक्रमाचे ठिकाण व वेळेत कोणत्याही प्रकारचा बदल करू नये.

सभेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी. सभेला येताना व परत जाताना कोणीही आक्षेपार्ह घोषणाबाजी, हुल्लडबाजी, असभ्य वर्तन करणार नाही याची दक्षता घ्यावी.

सभेसाठी बोलावलेल्या सर्व वाहनांना पोलिसांनी दिलेल्या मार्गानेच प्रवास करण्याचा व मार्ग न बदलण्याच्या सूचना द्याव्या. त्या वाहनांनी शहरात व शहराबाहेर प्रवासादरम्यान त्या-त्या रस्त्यावर वेगमर्यादेचे पालन करावे. सभेला आलेल्या नागरिकांना त्यांची वाहने, दुचाकी, चारचाकी व इतर कोणतेही वाहन) पार्किंगसाठी निर्धारित केलेल्या ठिकाणीच पार्किंग करण्याच्या सूचना द्याव्यात. सभेसाठी येताना अथवा परत जाताना कोणत्याही प्रकारे मोटरसायकल, कार रॅली काढू नये. त्याचप्रमाणे राज ठाकरे यांना अधिकृत सुरक्षा पुरविण्यात आली असून आयोजकांनी त्यांच्या सभेच्या ठिकाणी येण्याच्या व सभेवरून परत जाण्याच्या वेळी कोणतीही रॅली काढू नये.

कार्यक्रमादरम्यान कोणतेही शस्त्र, तलवारी, स्फोटक अधिनियमातील तरतुदीचा भंग करू नये. प्रदर्शन करू नये व शस्त्र अट क्र. २,३,४ बाबत सभेत सहभागी होणाऱ्या नागरिकांना कळविण्याची जवाबदारी संयोजकांची राहील.

सदर कार्यक्रमात स्वयंसेवक नेमण्यात यावेत. त्यांची नावे, मोबाईल नंबर तसेच सभेसाठी औरंगाबाद शहराच्या बाहेरून निमंत्रित करण्यात आलेल्या नागरिकांच्या वाहनांची शहर/ गावांना अनुसरून संख्या, त्यांचा येण्याचा व जाण्याचा मार्ग येणाऱ्या लोकांची अंदाजे संख्या आदी माहिती सभेच्या एक दिवस अगोदर पोलीस निरीक्षक, सिटीचौक यांच्याकडे द्यावी.

सभेच्या ठिकाणाची आसन व्यवस्था कमाल मर्यादा १५००० इतकी असल्यामुळे त्या ठिकाणी १५००० पेक्षा जास्त लोकांना निमंत्रित करू नये. अशा प्रकारे क्षमतेपेक्षा अधिक लोकांना निमंत्रित करून काही ढकलाढकली, अव्यवस्था, गोंधळ, चेंगराचेंगरी निर्माण झाल्यास संयोजकांना जबाबदार धरले जाईल.

सभास्थानी सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी निर्देशित केलेल्या ठिकाणी मजबूत बॅरिकेट्स उभारावं, सभेसाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने योग्य ती तपासणी (Frisking) करण्याचा अधिकार पोलिसांना राहील. यामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

सभेदरम्यान कोणत्याही प्रकारे वंश, जात, भाषा, वर्ण, प्रदेश, जन्मस्थान, धर्म इत्यादी किंवा ते पाळत असणाऱ्या प्रथापरंपरा यावरून कोणत्याही व्यक्ती व समुदायाचा अपमान होणार नाही अगर त्याविरूद्ध चिथावणी दिली जाणार नाही अशी कृती, वक्तव्ये, घोषणाबाजी कोणीही करणार नाही, याची आयोजक व वक्त्यांनी कटाक्षाने दक्षता घ्यावी.

सभेसाठी वापरण्यात येणाऱ्या ध्वनिक्षेपकाबाबत सर्वोच्च न्यायालय निर्देश व ध्वनिप्रदूषण (नियंत्रण व नियमन) नियम २००० नुसार परिशिष्ट नियम ३ (१), ४ (१) अन्वये. आवाजाची मर्यादा असावी. वरील अटींचा भंग केल्यास पर्यावरण (संरक्षण) कायदा १९८६ च्या कलम १५ अन्वये ५ वर्ष इतक्या मुदतीच्या तुरुंगवासाची आणि रु.१,००,०००/- ( एक लाख फक्त) इतक्या दंडाची शिक्षा होऊ शकते.

सदर कार्यक्रमादरम्यान कुठल्याही अत्यावश्यक सुविधा उदा. शहर बस सेवा, अॅम्ब्युलन्स, दवाखाना, मेडिकल, विजपुरवठा, पाणी पुरवठा, दळणवळण यांना बाधा येणार नाही याची काळजी घ्यावी.

सभेच्या दिवशी वाहतूक नियमनासाठी या कार्यालयाकडून काढली जाणारी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ३६ अन्वयेची अधिसूचना सर्व संयोजक, वक्ते व सभेला येणाऱ्या नागरिकांना बंधनकारक राहील.

सभेसाठी येणाऱ्या महिला व पुरुषासाठी स्वतंत्र आसनव्यवस्था, पिण्याचे पाणी व स्वतंत्र स्वच्छतागृहची व्यवस्था करावी.

सभेसाठी वापरण्यात येणारी विद्युत यंत्रणा, बॅरिकेट्स, मंडप, ध्वनिक्षेपक सुस्थितीत असल्याची खात्री करावी व विद्युत यंत्रणेमध्ये काही बिघाड झाल्यास पर्यायी विद्युत यंत्रणेची (जनरेटरची) व्यवस्था अगोदरच करावी.

सदर कार्यक्रमादरम्यान मिठाई व अन्नदान वाटप होत असल्यास अन्न व मिठाईतून कोणासही विषबाधा होणार नाही याची दक्षता घ्यावी,

हा कार्यक्रम सुव्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी आपणास घालून दिलेल्या उपरोक्त अटींचे व शर्तीचे उल्लंघन केल्यास कार्यक्रमाचे सर्व संयोजक व वक्ते यांच्यावर प्रचलित विधी, उपविधी व नियमानुसार कारवाई केली जाईल व अशा कारवाई दरम्यान ही नोटीस मा. न्यायालयात पुरावा म्हणुन वापरली जाईल याची नोंद घ्यावी. जा.क्र. विशा- ५/आदेश/औ बाद / २०२२-१५७५ औरंगाबाद शहर दिनांक २२/०४/२०२२ रोजी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५९ कलम ३७ (१) (३) अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या आदेशाला अनुसरून ही परवानगी देण्यात येत आहे. सदर आदेशाची प्रत सोबत जोडलेली आहे. त्याचे पालन करण्यात यावे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com