
सुशील थोरात
Nagar News : सध्या लग्न म्हटले की पाच-दहा लाखांचा चुराडा ठरलेला आहे. त्यात लाखांचा डीजे, उडत्या चालीची गाणी, त्यावर ताल धराणारे नातेवाईक, मद्यधुंद मित्रमंडळींचे धुडगूस घालणारे नृत्य, मुहूर्त टळून गेला तरी रस्त्यावरच रेंगाळणारी नवरदेवाची वरात आणि उन्हात ताटकळत बसलेले वन्हऱ्हाडी, व्हीआयपींचे फेटे- हारतुरे असं चित्र पाहायला मिळतं. मात्र याला फाटा देत नगर तालुक्यातील हातवळण येथे शिंदे परिवाराचा विवाह सोहळा वारकरी परंपरेत पूर्ण धार्मिक पद्धतीने पार पडला आहे. सध्या या लग्नाची जोरदार चर्चा रंगलीये. (varkari wedding ceremony News)
लग्न सोहळ्यावर प्रत्येकजण लाखांचा खर्च करतो. प्री-वेडिंगपासून सुरू झालेला हा खर्च लग्न पार पडेपर्यंत दहा-पंधरा लाखांच्याही पुढे जातो. परंतु हातवळण येथील शिवाजी अश्रू शिंदे यांनी आपला मुलगा किरण याचा विवाह अगदी पारंपरिक पद्धतीने आयोजित केला होता.
समाजप्रबोधनात्मक उपक्रम म्हणून वरातीत नाचण्याऐवजी कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला.विशेष म्हणजे साखरपुडा, हळद, लग्न हे तीनही सोहळे एकाच दिवशी पार पडल्याने अनावश्यक खर्च टळला.
दुपारी नवरदेवाची वरात डीजेऐवजी टाळ-मृदंगाच्या गजरात निघाली.'ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषात वारकरी वेशातच नातेवाईक, मित्रमंडळी या दिंडीत सहभागी झाले. नवरदेवानेही हातात टाळ घेत या दिंडीत सहभाग घेतला.
दरम्यान, दुसरीकडे लग्नमंडपात सुनील महाराज झांबरे यांचे कीर्तन सुरू होते.आलेले वन्हऱ्हाडी कीर्तनात तल्लीन झाले होते. कीर्तनानंतर सीता स्वयंवराचा अभंग व शेवटी मंगलाष्टक होऊन हा विवाह पारपडला. लग्न समारंभातील वरातीऐवजी कीर्तन या शिंदे परिवाराच्या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.