nandurbar
nandurbar

‘साम’चा ग्राउंड रिपोर्ट..अतिदुर्गम भाग तहानलेलाच; झऱ्यातूनच भागवावी लागते तहान

‘साम’चा ग्राउंड रिपोर्ट..अतिदुर्गम भागात नळपाणी योजनेचा दावा फोल; झऱ्यातूनच भागवावी लागते तहान

नंदुरबार : मानव निर्देशांकात अखेरचा ठरणाऱ्या नंदुरबार जिल्ह्याच्या विकासासाठी कोट्यावधींच्या योजना राबविण्यात आल्या. याशिवाय जिल्ह्याला आकांक्षित जिल्हा घोषित केल्यावर झपाट्याने विकास होणार अशी अपेक्षा होती. पण ग्रामीण भागाच्या योजना आखून त्यांची अमंलबजावणी करणारे येथील जिल्हा परिषद प्रशासन उंटावरुन शेळ्या हाकत असल्याने व कार्यालयात बसूनच विकासाची गणिते मांडत असल्याने जिल्हा आजही पिछाडीवर आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि मध्यप्रदेश अशा तीन राज्यांच्या सीमेवर अतिदुर्गम भागात वसलेले धडगाव तालुक्यातील तिनसमाळ गावातील चारही पाड्यातील रहिवाशांना बाराही महिने सुर्योदयापासून ते थेट सूर्यास्तापर्यंत, तर कधी मध्यरात्रीपर्यंत पाण्यासाठी करावी लागणारी जिवघेणी कसरत विकासाचा दावा फोल ठरवणारीय. नेमक्या काय नरकयातना सोसाव्या लागताय येथील रहिवाशांना पाहूया एक दाहक वास्तव ग्राऊंड रिपोर्टमधून. (nandurbar-news-Ground-report-Thirst-has-to-be-quenched-by-springs)

धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागात वसलेले हे आहे तिनसमाळ गाव चार पाडे मिळून हे गाव बनलेय. चारही पाडे एकमेकांपासून जवळपास दीड ते दोन किमी अंतरावर आहेत. यामुळे गावाचा विस्तार जवळपास आठ किमी आणि चारही पाड्यांवरील लोकसंख्या सुमारे सहाशे इतकी आहे. मात्र येथील भौगोलिक परिस्थितीसोबतच प्रशासनाचा नाकर्तेपणा येथील रहिवाशांच्या जीवावर उठलाय. तिनसमाळच्या चारही पाड्यांवरील रहिवाशांना पाण्यासाठी दरीत उतरुन करावी लागणारी जीवघेणी कसरत अंगाचा थरकाप उडवणारी आहे.

nandurbar
भीषण अपघात..2 जण जागीच ठार, एक गंभीर

विकासापासून पाडे कोसोदूर

हंडा घेवून येथील रहिवाशांना कित्येक किमी पाण्याच्या शोधात खोल दऱ्यांमध्ये भटकंती करतात. तिनसमाळ गावांतर्गत पळासपाणीपाडा, पाटीलपाडा, गुडानचापडापाडा व डुठलपाडा असे चार पाडे असून रहिवाशांना ना रस्ते, ना पाणी आणि कोणत्याही मुलभूत सुविधा नाही. विकासापासून हे पाडे कोसोदूर आहेत. सन १९९७ पासून ते आजपर्यंत येथील रहिवाशी पिण्याचे पाणी मिळावे यासाठी संघर्ष करतांना दिसताय. अनेक लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, संबंधित विभागांचे अधिकारी आले अन्‌ गेले. पण येथील रहिवाशांचा प्रश्न आजही तसाच आहे. अनेकदा येथील गावाला पाणी पुरवठ्याचा प्रस्ताव पाठविण्यात येतो. मात्र तो शासनाच्या लालफितीत अडकून पडतो. जेमतेम योजना कार्यान्वित झाली तरी संबंधित विभागाच्या नाकर्तेपणामुळे शासनाचा निधी खर्च होतो खरा, पण योजना मात्र अपूर्णच राहते आणि गावकऱ्यांची तहानही तशीच. आजही नेसर्गिक झऱ्यातूनच तहान भागवावी लागते.

२००८ मध्‍ये प्रस्‍ताव, पण अजूनही तहानलेलेच

सन २००८ मध्ये तिनसमाळच्या चारही पाड्यांसाठी नर्मदा नदीवरुन पाणी पुरवठ्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला. यावेळी सुमारे ५४ लाख रुपये खर्च अपेक्षित होता. मात्र याची दखल न घेतली गेल्याने त्यानंतर सलग २००९, २०१० व २०११ असे चार वर्षांपर्यंत प्रस्ताव पाठविण्यात आले. मात्र सदरचे प्रस्ताव प्रशासनाच्या लालफितीच अडकल्याने येथील रहिवासी आजही तहानलेले आहेत. त्यांची पिण्याच्या पाण्यासाठी असलेली जिवघेणी कसरत कधी जिवावर बेतणार? हे त्यांनाही माहित नाही. यामुळे अनेकदा त्यांच्यावर बितणाऱ्या आपबिती ऐकतांना अंगावर शहारे येतात.

तहान भागल्याचा खोटा दावा

नंदुरबार जिल्हा परिषद प्रशासनाच्या जलव्यवस्थापन विभागाकडून पाणी पुरवठा योजनेला गती देण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र येथील अधिकाऱ्यांकडून उंटावरुन शेळ्या हाकण्याचा प्रकार होत असल्याने ही योजना येथील रहिवाशांपर्यंत पोहचू शकली नाही. दुर्देवाने आजही स्थिती जैसे-थे आहे. चार दिवसांपूर्वी जि.प. स्थायी समितीच्या सभेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तिनसमाळला पाणी पोहचल्याची खोटी माहिती सभागृहात सादर करण्यात आली होती. यावेळी पदाधिकाऱ्यांकडून संबंधित अधिकाऱ्यांची कानउघाडणी करण्यात आली. प्रत्यक्षात नर्मदा नदी ते पाड्यांपर्यंतचे अंतर तीन ते आठ किमीहून अधिक आहे. मात्र पाणी पहिल्या पाड्यापर्यंत केवळ नावाला पोहचले आहे. प्रत्यक्ष लाभ मात्र अजून मिळालेला नाही. त्यामुळे आजही येथील नागरिकांना पाण्यासाठी दऱ्याखोऱ्यात पायपीट करावी लागत असतांना संबंधित विभागाकडून येथील रहिवाशांची तहान भागल्याचा दावा करण्यात आला आहे. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय बाविस्कर यांनी सभागृहाला खोटी माहिती देऊन आता मात्र बोलण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

पिण्याच्या पाण्यासाठी कधी रात्री, मध्यरात्री तर कधी पहाटेपासून भटकंती करावी लागते. प्रशासनाने आमच्या समस्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे. मात्र कायम दुर्लक्ष होत असल्याने आमचे हाल प्रशासन व लोकप्रतिनिधींना दिसत नाहीत.

– मिनाबाई पावरा, रहिवासी तिनसमाळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com