नाशिक साहित्य संमेलनाच्या गीतावरुन नवा वाद

नाशिकचं 94 वं साहित्य संमेलन आगळंवेगळं आणि कायम स्मरणात राहील, असं व्हावं यासाठी आयोजकांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
नाशिक साहित्य संमेलनाच्या गीतावरुन नवा वाद
नाशिक साहित्य संमेलनाच्या गीतावरुन नवा वादSaam Tv

नाशिक : नाशिकच्या 94 व्या साहित्य संमेलनावरून संमेलनाआधीचं अनेक नवनवे वाद निर्माण होत आहेत. सावरकरांच्या नावाचा विसर, राजकीय व्यक्तींची उपस्थितीवरील वाद थांबलेले नसतांनाचं आता आणखी संमेलनावरून एका नव्या वादाची भर पडली आहे. साहित्य संमेलनाचं जे गीत तयार करण्यात आलं आहे, त्या गीतातल्या दृश्यांवरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

नाशिकचं 94 वं साहित्य संमेलन आगळंवेगळं आणि कायम स्मरणात राहील, असं व्हावं यासाठी आयोजकांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र दुसरीकडे साहित्य संमेलनावरून सुरू असलेले वाद काही थांबायला तयार नाहीत. साहित्य संमेलनाच्या गीतामध्ये वापरण्यात आलेल्या दृश्यांवरून आता नवीन वाद निर्माण झाला आहे. या गीतात वापरण्यात आलेले व्हिडिओ चोरून वापरण्यात आल्याचा आरोप सोशल मिडीयावर करण्यात आला आहे. गीतात चोरून इतर कलाकार आणि निर्मात्यांची व्हिडिओ क्लिप वापरणं हा कलाकारांचा अनादर असल्याची भावना सोशल मीडियावर व्यक्त होत असून थेट साहित्य संमेलनाच्या फेसबुक पेजवरच हा आरोप करण्यात आल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.

या सर्व गोधळानंतर या गीताचे संगीतकार आणि गायक संजय गीते यांनी मात्र गाण्याचा व्हिडिओ तयार करताना घाई गडबडीत अनावधानाने काही चुक झाली असेल, तर त्यावरून वाद निर्माण करू नये. दृश्यांवर आक्षेप घेणाऱ्या संबंधितांचं समाधान करून हा वाद मिटवला जाईल, अशी माहिती या गीताचे संगीतकार आणि गायक संजय गीते यांनी साम टिव्हीशी बोलतांना दिली आहे.

या गीतातील केवळ दृश्यचं नाही तर काही दिग्गजांच्या फोटोवरून देखील आक्षेप घेण्यात आलेत. त्यावरून नाराजीदेखील व्यक्त करण्यात येतेय. मात्र घाई गडबडीत वेळ कमी असल्यानं काही चुका झाल्याचं मान्य करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. एकीकडे साहित्य संमेलन अवघ्या काही दिवसांवर आलेलं असतांना संमेलनाची जोरदार तयारी सध्या सुरुय. तर दुसरीकडे या साहित्य संमेलनावरून दररोज नवनवीन वाद निर्माण होतायत. त्यामुळे साहित्य संमेलन आणि वाद हे समीकरण नाशिकच्या संमेलनातही कायम आहे.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com