औरंगाबादमधील मुख्यमंत्र्यांच्या सभेला पोलिसांची परवानगी; मात्र घातल्या 'या' १६ अटी

औरंगाबाद शहरात ८ जून रोजी होणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेला आता पोलिसांनी परवानगी दिली आहे.
Permission for CM meeting
Permission for CM meetingSaam TV

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात ८ जून रोजी होणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सभेला पोलिसांनी परवानगी दिली आहे. मात्र, या सभेसाठी पोलिसांनी १६ अटी घातल्या आहेत. शिवसेनेच्या मराठवाड्यातील पहिल्या शाखेच्या ३७ व्या वर्धापनदिनानिमित्त ही सभा आयोजित करण्यात आली असून या सभेची जोरदार तयारी शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

काही दिवसांपुर्वीचं शिवसेनेने एक टीझर प्रसिद्ध केला होता. ज्यामध्ये 'औरंगाबाद नाही, संभाजीनगर, मी नाव दिलंय, शिवसेनेनं नाव दिलंय.' अशी शिवसेनाप्रमुख (Shivsena) बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणातील वक्तव्याचा वापर या टीझरमध्ये करण्यात आला होता. त्यामुळे शिवसेने या सभेची भरपूर तयारी केल्याचं दिसून येत आहे.

तसचं मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या औरंगाबादमधील सभेसाठी अटी घातल्या होत्या. त्यावेळीच मनसेकडून सरकारवर टीका करण्यात आली होती. आमचा आवाज दडपण्यासाठी सभेसाठी अटी घातल्याचं मनसे नेत्यांनी आरोप केले होते. त्यामुळे पोलिसांनी पक्षपातीपणा न करता सत्तेत असणाऱ्या शिवसेनेला देखील अटी घातल्या आहेत.

दरम्यान, मराठवाड्यातील शिवसेनेची पहिला शाखा औरंगाबादमध्ये (Aurangabad) ८ जून १९८५ रोजी स्थापन झाली. त्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या सभेसाठी संपूर्ण मराठवाड्यातील शिवसैनिक उपस्थित राहणार असल्याचं शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे.

पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी घातलेल्या अटी पुढीलप्रमाणे -

१) नमुद आयोजित कार्यक्रमापुर्वी आवश्यक असलेल्या इतर शासकीय विभागाचे आवश्यक ते परवाने प्राप्त करावेत. तसेच आपले तर्फे उभारण्यात आलेल्या स्टेजचे संबधीत ठेकेदाराकडुन तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन "स्टेज स्टॅबिलीटी " प्रमाणपत्र प्राप्त करून सदरचे सर्व परवाने पोलीस ठाणे सिटीचौक येथे कार्यक्रमापुर्वी सादर करावे.

२. सदर जाहीर सभा दिनांक ०८/०६/२०२२ रोजी १६.०० ते २१.३० या वेळेतच आयोजीत करावी. कार्यक्रमाचे ठिकाण व वेळेत कोणत्याही प्रकारचा बदल करु नये,

३. कार्यक्रमाचे वेळी कोणत्याही प्रकारे कोणताही रस्ता रहदारीस बंद करण्यात येवु नये अथवा वाहतुकीस कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी.

४. सभेत सहभागी होणान्या नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी. सभेला येतांना व परत जातांना कोणीही आक्षेपार्ह घोषणाबाजी, हुल्लडबाजी, असभ्य वर्तन करणार नाही याची दक्षता घ्यावी.

५. सभेसाठी बोलावलेल्या सर्व वाहनांना पोलीसांनी दिलेल्या मार्गानेच प्रवास करण्याचा व मार्ग न बदलण्याच्या सुचना द्याव्या. त्या वाहनांनी शहरात व शहराबाहेर प्रवासा दरम्यान त्या त्या रस्त्यावर विहीत वेगमर्यादेचे पालन करावे. सभेला आलेल्या नागरीकांना त्यांचे वाहने ( दोन चाकी, चार चाकी व इतर कोणतेही वाहन ) पाकींगसाठी निर्धारीत केलेल्या ठिकाणीच पाकींग करण्याच्या सुचना द्याव्यात. सभेसाठी येतांना अथवा परत जातांना कोणत्याही प्रकारे मोटारसायकल, कार रॅली काढू नये. त्याच प्रमाणे मा. मुख्यमंत्री महोदय यांना अधिकृत सुरक्षा पुरविण्यात आली असुन आयोजकांनी त्यांच्या सभेच्या ठिकाणी येण्याच्या व सभेवरुन परत जाण्याच्या वेळी कोणतीही रॅली काढु नये.

Permission for CM meeting
राज्यात पुन्हा मास्क अत्यावश्यक, पण...; आरोग्य मंत्री राजेश टोपे काय म्हणाले?

६. कार्यक्रमा दरम्यान कोणतेही शस्त्र, तलवारी, इत्यादी बाळगू नये अगर प्रदर्शन करु नये व शस्त्र अधिनियमातील तरतुदीचा भंग करु नये,

७. अट क्र.४,५,६ बाबत सभेत सहभागी होणान्या नागरीकांना कळविण्याची जबाबदारी संयोजकांची राहील.

८. सदर कार्यक्रमात स्वयंसेवक नेमण्यात यावेत, त्यांची नावे, मोबाईल नंबर तसेच सभेसाठी औरंगाबाद शहराच्या बाहेरुन निमंत्रीत करण्यात आलेल्या नागरीकांच्या वाहनांची शहर/ गावांना अनुसरुन संख्या, त्यांचा येण्याचा व जाण्याचा मार्ग, येणाऱ्या लोकांची अंदाजे संख्या ही माहीती सभेच्या एक दिवस अगोदर पोलीस निरीक्षक सिटीचौक यांचे कडे द्यावी.

९. सभा स्थानाच्या कमाल मर्यादेपेक्षा जास्त लोकांना निमंत्रीत करु नये. अशा प्रकारे क्षमतेपेक्षा अधिक लोकांना निमंत्रित करून काही ढकला ढकली, अव्यवस्था, गोंधळ, चेंगराचेंगरी निर्माण झाल्यास संयोजकांना जबाबदार घरले जाईल.

१०. सभास्थानी सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीसांनी निर्देशीत केलेल्या ठिकाणी मजबूत बेरीकेटस उभारावे. सभेसाठी येणाऱ्या प्रत्येक नागरीकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने योग्य ती तपासणी (Frisking) करण्याचा अधिकार पोलीसांना राहील. यामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय होणार नाही याची दक्षता घ्यावी.

११. सभेसाठी वापरण्यात येणाऱ्या ध्वनिक्षेपका बाबत मा. सर्वोच्च न्यायालय निदेश व ध्वनिप्रदुण (नियंत्रण व नियमन) नियम २००० नुसार परिशिष्ट नियम ३(१), ४(१) अन्वये क्षेत्र दिवसा ( ०६.०० ते २२.०० वा.) औद्योगिक क्षेत्र व्यापारी क्षेत्र ७५ डेसीबल ६५ डेसीबल निवासी क्षेत्र शांतता क्षेत्र ५५ डेसीबल ५० डेसीबलवरील प्रमाणे आवाजाची मर्यादा असावी, वरील अटींचा भंग केल्यास पर्यावरण (संरक्षण) कायदा १९८६ च्या कलम १५ अन्वये ५ वर्ष इतक्या मुदतीच्या तुरुंगवासाची आणि रु. १,००,०००/- ( एक लाख फक्त) इतक्या दंडाची शिक्षा होऊ शकते.

१२. सदर कार्यक्रमा दरम्यान कुठल्याही अत्यावश्यक सुविधा उदा. शहर बस सेवा, अॅम्बुलन्स, दवाखाना, मेडीकल, विजपुरवठा, पाणीपुरवठा, दळव-वळण यांना बाधा येणार नाही याची काळजी घ्यावी.

१३. सभेसाठी वापरण्यात येणारी विद्युत यंत्रणा, बॅरिकेट्स, मंडप, ध्वनिक्षेपक सुस्थीतीत असल्याची खात्री करावी व विद्युत यंत्रणेमध्ये काही बिघाड झाल्यास पर्यायी विद्युत यंत्रणेची ( जनरेटरची ) व्यवस्था अगोदरच करावी.

१४. कार्यक्रमाचे ठिकाणी आपत्कालीन परिस्थीतीत प्रथमोचाराच्या दृष्टीने सुसज्ज अॅम्बुलन्स ठेवण्यात यावी.

१५. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातुन आयोजकांमार्फत कायदा व सुव्यस्थेस कोणत्याही प्रकारे बाधा येणार नाही याची जबाबदारी संबंधित आयोजकांची राहील. तसेच कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी अंमलदार यांच्या कायदेशिर आदेशांचे तंतोतंत पालन करावे.

१६. हा कार्यक्रम सुव्यवस्थीतपणे पार पाडण्यासाठी आपणास घालुन दिलेल्या उपरोक्त अटींचे व शतींचे उल्लंघन केल्यास कार्यक्रमाचे सर्व संयोजक यांच्यावर प्रचलित विधी, उपविधी व नियमानुसार कारवाई केली जाईल व अशा कारवाई दरम्यान ही नोटीस मा. न्यायालयात पुरावा म्हणुन वापरली जाईल याची नोंद घ्यावी.

अशा १६ अटी औरंगाबाद पोलिसांकडीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी घातल्या आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com