"फिनॉमिनल हेल्थ"च्या चेअरमनला मुंबई विमानतळावरून अटक

"फिनॉमिनल हेल्थ"च्या चेअरमनला मुंबई विमानतळावरून अटक
Crime

लातूर ः महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये फिनॉमिनल हेल्थ पॉलिसीच्या माध्यमातून जाळं निर्माण करून हजारो लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी नंदलाल ठाकूरला अटक करण्यात आली आहे. लातूर आर्थिक गुन्हे शाखेने मुंबईत जाऊन ही कारवाई केली. ठाकूर हा फिनॉमिनल हेल्थचा अध्यक्ष आहे. त्याने हजारो लोकांना दामदुप्पट रकमेचे आमिष दाखवले होते.

लातूर शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्याच्यावर आर्थिक फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल होते. त्यामुळे हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले होतं. गेल्या दोन वर्षांपासून लातूर पोलीस आरोपीच्या मागावर होते. पोलिसांना माहिती मिळाल्यावरून आरोपीला मुंबई विमानतळाहून अटक केली.

Crime
यंदा उडीद पेरला असता तर... बघा, कसला भारी भाव मिळतोय!

लातूर येथील फिनॉमिनल हेल्थ केअर कंपनीच्या चालकाने लातूर शहरासह जिल्ह्यातील जवळपास दोन हजार नागरिकांना दामदुपटीचे आमिष दाखवले होते. आरोग्यविषयक सवलती देणार असल्याचेही त्याने भासवले होते. या प्रकाराला भुलून लोकांनी पॉलिसी घेतल्या.

१० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा

तब्बल १० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी २०१८ मध्ये शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल होता. या प्रकरणी काही संचालकांना अटक झाली होती. मात्र, प्रमुख आरोपी कंपनीचा चेअरमन नंदलाल ठाकूर हा फरार होता. त्यांच्याविरोधात लूकऑउट नोटीस जारी करण्यात आली होती. तो परदेशात पळून जाण्याच्या तयारीत होता. मुंबई येथील विमानतळावरून त्याला अटक करून लातुरात आणण्यात आले.

ठाकूरची बँक खाती गोठवली

लातूर न्यायालयाने त्याला दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या तो लातूर येथील शिवाजीनगर ठाण्याच्या कोठडीत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने चेअरमन नंदलाल ठाकूर आणि त्याच्या मुलाने विविध बँक खात्यातील आणि वेगवेगळ्या खात्यावर वळविलेली ३ कोटी ५ लाखांची रक्कम गोठविण्याची कारवाई केली आहे.

त्याच्या इतर मालमत्तांचा शोध घेतला जात आहे. आता या कंपनीच्या मालमत्तावरही टाच आणण्यात आली आहे. फसवणूक झालेल्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी सांगितले आहे.

नातेवाईकच आहेत संचालक

फिनॉमिनल हेल्थ केअर कंपनीच्या चेअरमनसह इतर २२संचालकां विरोधात लातुरात गुन्हा दाखल आहे. आता यातील फरार असलेल्या संचालकांच्या मागावर पोलीस आहेत. एकेका माशाला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कंपनीच्या चेअरमनच्या मुसक्या मुंबई येथील विमानतळावरून आवळल्या आहेत. यामध्ये बहुतांश संचालक म्हणून नंदलाल ठाकूर यांच्या जवळच्याच नातेवाईकांचा समावेश असल्याचे तपासामध्ये समोर आले आहे. या संचालक मंडळाने संगनमत करुन विविध आमिष दाखवत गुंतवणूकदारांना फसविल्याचे पुढे आले आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक पिंगळे यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com