
सचिन कदम
Raigad Mangaon News : रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये एका इमारतीच्या टेरेस, पायऱ्या आणि पार्किंगच्या परिसरात रक्ताचा सडा पडल्याचे दिसून आले होते. या घटनेचे गूढ कायम असतानाच आता याच इमारतीतील एका फ्लॅटमध्ये भयंकर घटना घडली आहे.
माणगाव शहरातील उतेखोलवाडी येथील महालक्ष्मी निवारा इमारतीतील एका फ्लॅटमध्ये एका ३४ वर्षांच्या तरुणाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. फ्लॅटमध्ये त्याने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. बुधवारीच या इमारतीच्या टेरेस आणि पायऱ्या तसेच पार्किंगच्या परिसरात रक्ताचे डाग आढळून आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, महालक्ष्मी निवारा इमारतीमध्ये ३४ वर्षीय राजेंद्र जाधव या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना आज, गुरुवारी उघडकीस आली आहे. शेजाऱ्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी फ्लॅटचा दरवाजा फोडल्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली आहे.
बुधवारी याच इमारतीच्या टेरेससह पायऱ्या आणि परिसरात सर्वत्र रक्ताचे डाग आढळून आले होते. त्यामुळे येथील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. पोलीस तपासातही काहीच हाती लागलं नव्हतं. या घटनेचा तपास सुरू असतानाच, आता तरुणाचा फ्लॅटमध्ये मृतदेह आढळून आल्याने गूढ आणखीनच वाढले आहे.
ते गूढ कायम
इमारतीच्या टेरेस आणि परिसरात रक्ताचे डाग आढळल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. रक्ताचे नमुने घेऊन पोलिसांनी आजूबाजूला चौकशीही केली. पण काही माहिती हाती लागू शकली नव्हती. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. परिसरात सीसीटीव्ही नसल्याने काही ठोस माहितीही हाती लागू शकली नाही. त्यात आता ही घटना उघडकीस आली आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.