Rain Update Live : नवी मुंबईत पावसाचा पुन्हा जोर, ताज्या अपडेट्स जाणून घ्या

पुढील दोन दिवस दक्षिण कोकण, गोवा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रासाठी 'रेड अलर्ट' आणि उत्तर मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
Rain Update Live
Rain Update LiveSAAM TV

पिंपरी-चिंचवडमध्ये पावसाची संततधार, भले मोठे झाड कारवर कोसळले

पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे. पिंपळे सौदागर येथे एक मोठे झाड कारवर कोसळल्याची घटना घडली आहे.

पुढील ५ दिवस कोकणसह मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात अतिमुसळधार पावसाचा अंदाज

मागील २४ तासांत कोकणसह मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडला. पुढचे ५ दिवस हीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर वादळाची शक्यता आहे, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाने दिली.

पुढील पाच दिवस विदर्भातील काही जिल्ह्यांत मुसळधार पाऊस

Summary

पुढील पाच दिवसांत विदर्भात चांगल्या पावसाचा अंदाज

विदर्भातील अकराही जिल्ह्यांत पडणार दमदार पाऊस

काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा

नागपूर हवामान विभागाने वर्तवला अंदाज

बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने विदर्भात चांगल्या पावसाचा अंदाज

शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

सध्या विदर्भाच्या सर्वच जिल्ह्यांत पावसाची संततधार सुरूच

वसईच्या मीठागरात अडकले ३०० - ४०० रहिवासी

वसईच्या मीठागर परिसरात मुसळधार पावसामुळं पाणी साचलं आहे. येथील रहिवासी घरांमध्ये अडकले आहेत. या परिसरात सध्या तीन ते चार फूट पाणी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या तीनशे ते चारशे नागरिक या परिसरात अडकले असल्याची शक्यता वर्तवली आहे. वसई-विरार महानगरपालिका अग्निशमन विभागाच्या वतीने त्यांना सहकार्य केले जात आहे.

रायगडमधील कुंडलिका आणि पाताळगंगा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली

रायगड जिल्ह्यातील कुंडलिका आणि पाताळगंगा या दोन नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पुराचा धोका सध्या नसला तरी, सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

महाडच्या सावित्री नदीमध्ये NDRF ने केले बचाव प्रात्याक्षिक

महाडमध्ये संभाव्य पुराचा धोका लक्षात घेऊन आपत्कालीन परिस्थितीत बचाव आणि मदत कार्यासाठी महाड आणि पोलादपूरमध्ये एनडीआरएफची दोन पथके तैनात करण्यात आली आहेत. महाडमधील नागरिकांच्या मनातील भीती दूर व्हावी, यासाठी NDRF पथकाने महाडच्या सावित्री नदी पात्रात बचाव कार्याची प्रात्यक्षिके केली.

मुसळधार पावसाचा मुंबईत लोकलला फटका

दोन दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस (Rain) सुरू आहे. या पावसाचा परिणाम आता लोकल ट्रेनवर (Local Train) झाला आहे. मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वे मार्गावरील गाड्या १० ते २० मिनिट उशिरा धावत आहेत. रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे रेल्वे पटरीवरही पाणी साचले आहे, त्यामुळे रेल्वेगाड्या धावण्यास उशीर होत आहे.

कोयना धरणाच्या पाणी साठ्यात वाढ

कोयना धरण क्षेत्रात कालपासून पावाची संतत धार सुरू आहे. त्यामुळे धरणात येणारे पाणी वाढण्यास सुरवात झाली आहे. गेल्या २४ तासात धरणातील पाणी साठ्यामध्ये २.८८ टीएमसीने वाढ झाली आहे.

कोयना धरण पाणीसाठा - २०.७१ टीएमसी (१९.६७%)

धरणात येणारे पाणी -३३३५९ क्युसेक

कोयना - १०३ मिमी

नवजा - १६२ मिमी

महाबळेश्वर -१४७ मिमी

विदर्भातील बगाजी सागरचे ७ दरवाजे उघडले

विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अमरावती आणि वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या लोवर वर्धा प्रकल्पाच्या बगाजी सागर धरणात सद्या ७१.९६ टक्के जलसाठा आहे. या धरणाचे ७ दरवाजे उघडण्यात आले आहेत. यातून ३० सेमी ने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदी पात्रात पाण्याचा विसर्ग होत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय नदीपात्रात कुणीही उतरू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन दिवस रेड अलर्ट

सिंधुदुर्गात पहाटे पासूनच पावसाची संततधार रिपरीप तर काही वेळा मोठ्या सरी कोसळत आहेत. सध्या नद्यांच्या पाण्याची पातळी कमी असली तरी मोठा पाऊस झाल्यास पूरस्थिती निर्माण होऊ शकते, त्यामुळे खबरदारी म्हणून एनडीआरएफच्या २२ जवानांचे एक पथक सिंधुदुर्गात तैनात करण्यात आले आहे. हे पथक पुढील तीन दिवस जिल्ह्यात कार्यरत आहे. हवामान विभागाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन दिवस रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी व सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हाप्रशासना कडून देण्यात आल्या आहेत.

नवी मुंबईत संततधार सुरूच

नवी मुंबईतही सकाळपासून पावसाची संततधार सुरूच आहे. सलग चार दिवस नवी मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. पावसाचा जोर जास्त वाढल्यास सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे.

रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट

हवामान खात्याने रायगड जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट दिला असला तरी जिल्ह्यात आजही पावसाचा जोर कमी असल्याचे दिसत आहे. अलिबागसह जिल्ह्याच्या सर्वच भागात अधून मधून पावसाच्या सरी कोसळत असून पावसाची रिपरिप सुरू आहे.

वसई विरार मध्ये मुसळधार

कास रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरुच आहे. वसई विरार मध्ये मुसळधार पावसामुळे शाळांना सुट्टी देण्यात आल्या आहेत. रस्त्यांवर गुढगाभर पाणी साचल्याने स्कूल बस बंद आहेत. रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. अधून मधून पावसाच्या सरी, रेड अलर्ट कायम असल्याने प्रशासन सज्ज आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस 'रेड अलर्ट'

आयएमडीने पुढील दोन दिवस दक्षिण कोकण, गोवा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रासाठी 'रेड अलर्ट' आणि उत्तर मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. येत्या तीन दिवसांत पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे.

याशिवाय सातारा जिल्ह्यासाठी ६ ते ८ जुलै आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठी ७ ते ९ जुलैपर्यंत रेड अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com