रोहित पवार म्हणतात, यामुळेच कर्जत-जामखेडकरांचा अभिमान वाटतो

खर्डा ः शिवपट्टण किल्ल्याची पाहणी करताना आ. रोहित पवार.
खर्डा ः शिवपट्टण किल्ल्याची पाहणी करताना आ. रोहित पवार.साम टीव्ही

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते व आमदार रोहित पवार यांच्या अनोख्या संकल्पनेतून उतरलेल्या विक्रमी उंचीच्या भगव्या स्वराज्य ध्वजाची प्रतिष्ठापना विजयादशमीच्या मुहूर्तावर केली जाणार आहे. लवकरच होणाऱ्या या स्वराज्य ध्वजाच्या प्रतिष्ठापना सोहळ्याबाबत राज्यभरात उत्सुकता वाढीस लागली आहे.

दरम्यान रोहित पवार यांनी आज स्वत: या सोहळ्याच्या स्थळाची म्हणजे खर्डा भुईकोट किल्ल्याला भेट देऊन कार्यक्रमाच्या पूर्वतयारीची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी कर्जत-जामखेडमधील ग्रामस्थांचीही भेट घेतली. कर्जतकर नागरिक आणि सर्व सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी यांनीही वेळात वेळ काढून आज खर्डा किल्ल्याच्या परिसरात स्वच्छता केली.

खर्डा ः शिवपट्टण किल्ल्याची पाहणी करताना आ. रोहित पवार.
Dussehra Melava | शिवसेना दसरा मेळाव्याची जागा अखेर ठरली (पहा व्हिडिओ)

याबाबत मी त्यांचा मनापासून आभारी आहे. कोणत्याही सामाजिक कार्यात ही मंडळी स्वतःहून सहभाग घेतात. यातच कर्जतचं वेगळेपण आहे. आणि त्याचा मला अभिमान आहे. असे उद्गार काढून त्यांनी सहभागी कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे कौतुक केले. खर्ड्याच्या किल्ल्यासमोर दसऱ्याच्या दिवशी झळकणा-या भगव्या 'स्वराज्य ध्वजा'च्या स्तंभाची पाहणी करून कार्यक्रमासाठी लोकसहभागातून सुरू असलेल्या तयारीचा आढावा त्यांनी घेतला. तसंच यावेळी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत नियोजनाबाबत चर्चा केली.

७४ मीटर उंच

कर्जत-जामखेड तालुक्याला नवी ओळख मिळवून देणारा हा स्वराज्य ध्वज अनेकांसाठी आता आदर्श प्रेरणा बनला आहे. महाराष्ट्राच्या शौर्यशाली परंपरेतून जन्मलेल्या, एकतेची-बंधुत्वाची हाक देणा-या व ७४ मीटर अशा विक्रमी उंचीने सर्वांच्या मनात भरलेल्या भगव्या स्वराज्य ध्वजाने थोड्याच दिवसात अथक यात्रेकरवी जनमानसात आणि देशभरातही महाराष्ट्राच्या करारी इतिहासाची ओळख पोहोचवण्यात मोठं योगदान दिलं आहे.

३७ दिवसांचा अहोरात्र प्रवास करीत ९६ शक्तीपीठे आणि प्रेरणास्थळांना वंदन करून महाराष्ट्रातील ३६ जिल्हे व इतर पाच राज्यांना भेट देऊन पुन्हा राज्यात पोहोचलेला हा भगवा स्वराज्य ध्वज आता कायमच उंच झळकून आपल्या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श स्वराज्यधर्माची आठवण करून देत राहाणार आहे.

खर्ड्याच्या ऐतिहासिक शिवपट्टण किल्ल्यासमोर 'स्वराज्य ध्वज' उभारणीच्या कार्यक्रमाची लोकसहभागातून जोरदार तयारी सुरू झाली आहे. समानतेचा भगवा स्वराज्य ध्वज उभारण्यासाठी ग्रामस्थ व इतर मंडळींनी जय्यत तयारी सुरू केली. किल्ल्याचा परिसर स्वच्छ केला जात आहे. तिथली जुनी टाकी, विहिरीदेखील साफ केल्या जात आहेत. युवावर्गाने उत्साहाने या ध्वजारोहणाच्या निमित्ताने होणा-या स्वच्छता मोहिमेत अत्यंत उत्साहाने भाग घेतल्याचं चित्र दिसत आहे.

स्वराज्य ध्वजाचे वजनच ९० किलो

हिंदवी स्वराज्य संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ६ जून १६७४ रोजी झालेल्या राज्याभिषेकाचे स्मरण म्हणून या ध्वजाची उंची ७४ मीटर ठेवण्यात आली. या ध्वजाचा आकार ९६X६४ फूट आहे. ध्वजस्तंभाचे वजन १८ टन आहे. नुसत्या ध्वजाचे वजन ९० किलो आहे. साडे पंचावन्न हजार चौरस फूट आकार असलेला हा ध्वज देशात सर्वांचे आकर्षण ठरला आहे. असा हा मंगल ध्वज कर्जत-जामखेडवासियांसाठी सध्या अभिमानाचा विषय आहे.

राजे निंबाळकरांनी बांधला किल्ला

ध्वज प्रतिष्ठापना आणि ध्वजारोहणाच्या निमित्ताने या किल्ल्याची डागडुजी केली जात आहे. या किल्ल्याची निर्मिती सरदार राजे निंबाळकर यांनी १७४३ साली केली होती. इ.स १७९५ मध्ये अहमदनगरजवळ खर्डा या ठिकाणी हैदराबादच्या निजामाला मराठ्यांनी पाणी पाजले. ही अखेरची शौर्यगाथा याच शिवपट्टण किल्ल्याच्या परिसरात लिहिली गेली. हा ऐतिहासिक किल्ला जामखेडजवळ खर्डा या ठिकाणी आजही भरभक्कम अवस्थेत उभा आहे. अभेद्य तटबंदी असणारा हा किल्ला सहा खणखणीत बुरुजांनी संरक्षित आहे. आता येत्या दस-याला अवघ्या राज्याचं नवं स्वप्न असणा-या या भगव्या स्वराज्य ध्वजाची सन्मानाने दिमाखदार प्रतिष्ठापना होईल आणि पुन्हा एकदा या किल्ल्यासमोर नवा विक्रमी इतिहास रचला जाईल.

Edited By - Ashok Nimbalkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com