देवेंद्र फडणवीस हे नकली हिंदुत्वाचे पुरस्कर्ते; संजय राऊतांचा घणाघात

संजय राऊत म्हणाले, मी शरद पवार यांचा आभारी आहे, कि त्यांनी पंतप्रधानांची भेट घेऊन माझ्याविषयी भूमिका मांडली.
Devendra Fadnavis | Sanjay Raut
Devendra Fadnavis | Sanjay Raut SaamTvNews

दिल्ली : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई करत ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) दादर येथील सदनिका व अलिबाग येथील जमिन जप्त केली. या कारवाईनंतर राज्यातील राजकारणाला पुन्हा उकळी फुटल्याचे दिसून येत आहे. आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) दिल्लीमध्ये भेट घेतल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. नुकतीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि शरद पवार (Sharad Pawar) यांचीही भेट झाली आहे. मोदींसोबतच्या भेटीत पवारांनी संजय राऊत यांच्यावर ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईचा मुद्दा मांडला असून याबाबत खुद्द पवार यांनीच माध्यमांना माहिती दिली.

पवार साहेबांचा आभारी, त्यांनी माझ्याविषयी पंतप्रधानांकडे भूमिका मांडली

या घडामोडीनंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका मांडली. यावेळी बोलताना संजय राऊत म्ह्म्णाले, मी शरद पवार यांचा आभारी आहे कि त्यांनी पंतप्रधानांची भेट घेऊन माझ्याविषयी भूमिका मांडली. महाराष्ट्रामध्ये केंद्रीय यंत्रणांचा जो हैदोस आणि स्वैराचार सुरु आहे याबाबत शरद पवार यांनी पंतप्रधानांचे लक्ष्य वेधले. ईडीकडून (ED) कारवाई झाली हा केवळ माझा वैयक्तिक प्रश्न नसून राज्यात महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर अश्याप्रकारे चुकीच्या आणि अन्याय्य कारवाया राजकीय दबावाखाली सुरु आहेत.

शरद पवारांची भूमिका राष्ट्रहितासाठी महत्वाची

शरद पवार यांच्यासारख्या मोठ्या नेत्याने, पंतप्रधानांकडे महाराष्ट्रात काय सुरु आहे आणि केंद्रीय तपास यंत्रणा महाराष्ट्रात (Maharashtra) काय करत आहेत हे सांगणे म्हणजे देशातील ज्या ज्या राज्यांमध्ये विरोधकांची सत्ता आहे व तिथे केंद्रीय यंत्रणांकडून जी चुकीची कारवाई सुरु आहे त्यांचेच म्हणणे मांडण्यासारखे आहे. आज देशातल्या सगळ्या विरोधी पक्षांची भूमिका पवारांनी मांडली आहे. शरद पवार हे ज्या उंचीचे नेते आहेत, ५० वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांनी संसदीय राजकारणात घालवला आहे. त्यांच्या कामाची आणि विचारांची उंची मोठी असल्यामुळे त्यांनी पंतप्रधानांकडे यासंदर्भात भूमिका मांडल्याचे संजय राऊत म्हणाले.

तपास यंत्रणांना घाबरत नाही

शरद पवार यांनी पंतप्रधानांकडे तपास यंत्रणांकडून सुरु असलेल्या गळचेपीबद्दल बाजू मांडल्यानंतर तरी तपास यंत्रणांच्या कारवायांमध्ये काही फरक पडेल का? असा प्रश्न राऊत यांना माध्यमांनी विचारल्यानंतर राऊत म्हणाले, तपास यंत्रणांच्या कारवायांमध्ये फरक जरी नाही पडला तरी आम्ही त्यांना घाबरत नाही.

किरीट सोमय्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा

आयएनएस विक्रांतच्या (INS Vikrant) नावावर कोट्यवधी रुपये गोळा करून राष्ट्राची सुरक्षा, लोकांच्या भावना यांच्याशी खेळणाऱ्या आणि त्या पैशांचा अपहार करणाऱ्या किरीट सोमय्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे असे संजय राऊत म्हणाले.

देवेंद्र फडणवीस हे नकली हिंदुत्वाचे पुरस्कर्ते

आयएनएस विक्रांत जहाजाच्या संवर्धनासाठी किरीट सोमय्या (Kirit Somaiyya) यांनी कोट्यवधी रुपयांची देणगी गोळा करून हा पैसा हडपल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. या आरोपांचे खंडन करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सर्व आरोप फेटाळले. फडणवीसांबद्दल बोलताना राऊत म्हणाले, स्वतःला प्रखर राष्ट्रवादी म्हणवणारे, हिंदुत्ववादी म्हणवणारे देवेंद्र फडणवीस आयएनएस विक्रांत घोटाळ्याचे समर्थन करत आहेत. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव असून हिंदुत्वाचा नकली गजर करणाऱ्यांचे खरे रूप यातून बाहेर पडले आहे. आयएनएस विक्रांत हा संपूर्ण देशाच्या स्वाभिमानाचा विषय असून त्यासंदर्भातील भ्रष्टाचार समोर असूनही भ्रष्टाचारी सोमय्यांचे समर्थन नकली हिंदुत्वाचे पुरस्कर्ते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) करत असल्याची घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com