सिंधुदुर्ग : शनिवारपर्यंत अतिवृष्टीचे संकेत; अशी घ्या काळजी

sindhudurg rain update
sindhudurg rain update

सिंधुदुर्ग : तळकोकणात पावसाचा जोर वाढतोय sindhudurg rain update जिल्ह्यात आजपासून (गुरुवार ता. 15) 18 जुलैपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कासार्डे ते गडमठ या मार्गावर छोट्या पुलावरून पाणी गेल्याने पाच गावांचा संपर्क तुटला आहे. गेले पाच दिवस सतत पडत असलेल्या पावसामुळे नागरिकांना सतर्क राहा असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी केले आहे. (sindhudurg-rain-update-heavy-rainfall-likely-occur-till-18-july)

याबराेबरच पाऊस आणि पाऊस पडल्यानंतर नागरिकांनी काेणती काळजी घ्यावी याबाबतच्या सूचना जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांना करण्यात आल्या आहेत.

पाऊस सुरु हाेण्यापुर्वी अथवा पाऊस पडत असताना विजा चमकत असतील तर नागरिकांनी संगणक, दूरचित्रवाणी आदी विद्युत उपकरणे बंद ठेवावीत. दूरध्वनी, भ्रमणध्वनीचा शक्यताे वापर टाळावा. नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घरा बाहेर जावे. घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. विजेच्या खांबांपासून लांब रहावे. उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये.

एखाद्या मोकळया परिसरात असल्यास गुडघ्यात डोके घालून वाकून बसावे. धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात. अतिमुसळधार व अतिवृष्टीच्या परिस्थितीत कोणत्याही परिस्थितीत सुरक्षित ठिकाणी रहा व पायी अथवा वाहनाने प्रवास करु नका.

sindhudurg rain update
मी आज फार आनंदित झालाेय : नारायण राणे

घरा बाहेर पडणे अत्यावश्यक असल्यास निघण्यापूर्वी अधिकृत स्त्रोतांकडून हवामानाची, रेल्वेची व रस्ते वाहतुकीची आणि पाणी तुंबलेल्या ठिकाणांची माहिती करुन घ्या. अतिवृष्टी कालावधीत झाडे पडणे, घर किंवा इमारत कोसळणे, पूर येणे, दरडी कोसळणे अशा आपत्ती घडण्याची शक्यता असते. अशावेळी नागरिकांनी सतर्क रहावे अशा ही सूचना करण्यात आल्या आहेत.

आप्तकालीन स्थिती निर्माण हाेण्याची शक्यता असलेल्या रहिवास ठिकाणी प्रशासनाकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करावे. पूरप्रवण क्षेत्र व पाणी तुंबण्याची ठिकाणी जागरूक रहावे व योग्य ती दक्षता घ्यावी. जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती, पूल आदी ठिकाणी जाऊ नये. अतिवृष्टी होत असताना कोणीही समुद्रात, नदी - नाले इत्यादी ठिकाणी जाऊ नये. अतिवृष्टी कालावधीत रस्ते निसरडे बनल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी वाहन चालवताना आवश्यक ती काळजी घ्यावी.

पुराच्या पाण्यात, समुद्रात नागरिकांनी सेल्फी काढू नये. सेल्फीच्या नादात नागरिकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालू नये. हवामान विभागाकडून दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या जीवित व मालमत्तेची काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com