
चेतन व्यास
वर्धा : वर्ध्यातील रहिवासी व्यक्तीचे धोत्रा चौरस्त्यावर मोठी प्लॅनिंग करुन अपहरण करण्यात आले. आरोपींनी दहा लाखांची खंडणी मागून दोन लाखांत ‘सेटिंग’ झाली. पोलिस अधिक्षकांनी कारवाईचे आदेश दिले. अन् स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रात्रीतून अवघ्या सहा तासांत तेलंगणा राज्यात जात ‘सर्जिकल स्ट्राईक’ करुन सहाही आरोपींना अटक केली. सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता सहा दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली.
पोलिसांनी (Police) अटक केलेल्या आरोपींची नावे शेख मुखीद अहमद शेख युसुफ, सूर्यकांत राम मटपती, शाहरुख पठाण अजीज पठाण, संजय देवन्ना ओसावार, नंदकुमार रामचंद्र शेटे, विठ्ठल पांडुरंग कांबळे सर्व रा. रणदिवे नगर, आदिलाबाद, राज्य तेलंगणा अशी आहेत.
तेतला लक्ष्मीनारायण रेड्डी (४२) रा. कुलुकुलुरु आंध्रप्रदेश ह.मु. वर्धा हा एका फायनान्स कंपनीत काम करतो. तो दररोज बचतगटाच्या माध्यमातून कर्ज वितरीत करणे तसेच वसूल करण्याचे काम करतो. त्याच्याच कंपनीत आरोपी विठ्ठल पांडुरंग कांबळे आणि नंदकुमार रामचंद्र शेटे हे देखील काम करतात.
तेतला हिंगणघाट येथे कर्ज वसुलीसाठी व कर्ज वितरणासाठी नेहमी जायचा याची माहिती हिंगणघाट येथील एजंट विठ्ठल याला होती. त्याने त्याच्या इतर साथीदारांना ही बाब सांगितली होती. त्यानुसार तेतला याला लूटण्याची प्लॅनिंग सुरु झाली.
१ मार्च रोजी तेतला हा हिंगणघाट येथून वर्धा (Wardha) येथे येत असताना धोत्रा चौरस्त्यावर त्याला अडवून त्याचे किडनॅप करीत ४८ हजारांची रक्कम लूटण्यात आले. इतकेच नव्हेतर त्याच्या जावयाला फोन करुन १० लाखांची खंडणी मागण्यात आली. आरोपी विठ्ठल कांबळे यालाच त्याच्या जावयाने फोन करुन याची माहिती दिली आणि मग काय, प्रकरण दोन लाखांत सेटल झाले.
आरोपी विठ्ठल आणि नंदकिशोर या दोघांनीच ते पैसे आर्वी नाका येथून ‘कलेक्ट’करीत आरोपींना दिले. त्यानंतर इंजापूर येथे तेतला याला सोडून देण्यात आले होते. याप्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक अमोल लगड व त्यांच्या टिमकडे सोपविण्यात आला. लगड यांनी रात्रीच तेलगंणा राज्यातील आदिलाबाद गाठून सहा तासांचे ‘सर्जिकल स्ट्राईक’ करीत सहाही आरोपींना बेड्या ठोकल्या.
तेतला रेड्डी आरोपी विठ्ठल कांबळे, नंदकिशोर शेटे हे तिघेही वर्धा जिल्ह्यात फायनान्स कंपनीचे एजंट म्हणून काम करायचे. विठ्ठल हा हिंगणघाट तर नंदकिशोर व तेतला हे दोघे वर्धा सांभाळत होते. तेतला नेहमी हिंगणघाट येथे पैशांची वसूली व कर्ज वाटपासाठी जायचा याची माहिती विठ्ठलला होती. विठ्ठलनेच इतर आरोपींना याची माहिती दिली. त्यानुसार प्लॅनिंग करण्यात आली.
तेतला ज्या दुचाकीने हिंगणघाट येथून निघाला त्याच्याच मागे विठ्ठलही निघाला. विठ्ठलने आधीच तेतला भगव्या रंगाचा शर्ट घालून असल्याचे आणि दुचाकीचा क्रमांक इतर आरोपींना सांगितला होता. धोत्रा चौरस्त्यावर सर्व आरोपी दबा धरुनच होते. अखेर तेतलाचे चौघांनी किडनॅप करीत खंडणीची रक्कम उकळली.
आरोपींची कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. आरोपींनी पुन्हा तेतलाच्या पुतण्याला फोन करुन ५० हजारांची मागणी केली होती. त्यापैकी २० हजार रुपये पुन्हा तेतला याने आरोपींच्या ओळखीतील व्यक्तीच्या बॅंक खात्यात ट्रान्सफर केले. पण, मराठी भाषा समजत नसल्याने तेतलाने याने वर्ध्यातील नातलगाला फोन केला अन् पोलिस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली.
पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांना सर्व आपबिती कथन केली. त्यानंतर पोलिसांनी ‘ऍक्शन प्लॅन’ तयार करुन लगेच तेलंगणा राज्यात जात आदिलाबादेत सर्जिकल स्ट्राईक करुन आरोपींना बेड्या ठोकल्या.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.