
Dr. Narendra Dabholkar : जादूटोणा विरोधी कायदा महाराष्ट्रात लागू झाला खरं. परंतु आज अखेर महाराष्ट्रात तीन वेळा सरकार बदललं. आलटून पालटून सर्व प्रमुख पक्ष सत्तेत आले मात्र कायद्याची प्रभावी अंमलबजावणीसाठीचे नियम करायला कोणत्याच सरकारला (government) वेळ मिळाला नाही अशी खंत अंधश्रद्धा निर्मुलन समितीनं व्यक्त केली आहे. नवे सरकार तरी हे नियम करेल का ? असा सवाल महाराष्ट्र अनिसच्या डाॅ. हमीद दाभोलकर आणि प्रशांत पोतदार यांनी केला आहे.
महाराष्ट्र अनिसचे संस्थापक कार्यध्यक्ष नरेंद्र दाभोलकर (narendra dabholkar) यांच्या निर्घुण खुनाला २० ऑगस्टला नऊ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांच्या बलीदानाच्या नंतर तेव्हाच्या सरकारने जादूटोणा विरोधी कायदा महाराष्ट्रात लागू केला मात्र आज अखेर महाराष्ट्रात तीन वेळा सरकार बदललं पण कायदा निर्माण झाल्यावर त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठीचे नियम झालेले नाहीत असे अनिसनं पत्रकात म्हटलं आहे.
महाराष्ट्रात गेल्या दोन महिन्यांत म्हैसाळ येथील नऊ जणांचे हत्याकांड, सातारा येथील गुप्तधनाच्या लालसेमधून झालेल्या नरबळीचा छडा लागणे, पुणे येथील गुप्तधनाच्यासाठी बळी देण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना अटक, नागपूर येथील पाच वर्षाच्या बालकाचा भुताने झपाटले आहे म्हणून नातेवाईकानी मारहाण केल्याने झालेला मृत्यू अशा अनेक मानवतेला काळिमा फासणाऱ्या अंधश्रद्धा विषयक घटना घडल्या आहेत.
ह्या पार्श्वभूमीवर जादूटोणा विरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. त्याचा प्रमुख भाग म्हणून जादूटोणा विरोधी कायद्याचे नियम तातडीने तयार करावेत अशी अपेक्षा पत्रकात व्यक्त करण्यात आली आहे.
जादूटोणा विरोधी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कायद्या अंतर्गत नमूद केलेल्या दक्षता अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण घेणे हे देखील अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या पातळीवर जादूटोणा विरोधी कायदा प्रभावी अंमलबजावणीसाठी एक नोडल पोलीस अधिकारी नेमणे आवश्यक आहे असे देखील पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
शासनाच्या वतीने जादूटोणा विरोधी कायदा अंमलबजावणीसाठी पुरेसे प्रयत्न होत नसले तरी महाराष्ट्र अनिस सारख्या संघटना आणि सजग नागरिकांच्या माध्यमातून महाराष्ट्रात गेल्या नऊ वर्षात एक हजार पेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामधील काही गुन्ह्यात लोकांचे शोषण करणाऱ्या बाबा बुवांना शिक्षा देखील झाली आहे. यामध्ये सर्व धर्मातील बाबा बुवांना शिक्षा झाल्याचे वास्तव देखील पुढे आले आहे असे महाराष्ट्र अनिस सातारा जिल्हा कार्याध्यक्ष वंदना माने यांनी नमूद केले आहे.
ALL इंडिया पिपल सायन्स नेटवर्क आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या वतीने डॉ नरेंद्र दाभोलकर यांचा स्मृती दिन हा राष्ट्रीय वैद्यानिक दृष्टीकोन दिवस म्हणून पाळला जातो. केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, दिल्ली, आसाम, पंजाब, तामिळनाडू,झारखंड, बिहार पश्चिम बंगाल ह्या राज्यांच्यामध्ये या निमित्त वैद्यानिक दृष्टिकोनाचा प्रचार आणि प्रसार करणारे कार्यक्रम घेतले जाणार आहेत.
महाराष्ट्राच्या जिल्ह्या जिल्ह्यातून २० ऑगस्टला सकाळी सात वाजता निर्भय मॉर्निंग वॉक काढणे, राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिनानिमित्त शाळा, कॉलेजमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनावर सप्रयोग व्याख्यान देणे, डॉ. नरेद्र दाभोलकर खून तपासाबाबत जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना निवेदन देणे आपल्या गावातील सार्वजनिक ठिकाणी, महापुरुषांच्या, पुतळ्याजवळ टेबल टाकून नवीन अंनिस कार्यकर्ता आणि अंधश्रद्धा निर्मुलन वार्तापत्र सभासद नोंदणी अभियान हे कार्यक्रम घेतले जाणार आहेत.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.